सरकार स्थापनेच्या शक्यता पडताळून पाहणार पक्ष
वृत्तसंस्था/ जम्मू
अनेक एक्झिट पोल्समध्ये जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. परंतु नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला अधिक जागा मिळणार असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे कुठल्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भाजपला केंद्रशासित प्रदेशात 27-32 जागा मिळण्याचा अनुमान आहे. अशा स्थितीत भाजप तेथील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरल्यास सरकार स्थापन करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याचे काम पक्षनेतृत्वाने हाती घेतले आहे.
भाजप अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. भाजपने पडद्याआडून त्यांना समर्थन देखील दिले होते. पक्षाने खोऱ्यात यावेळी सर्व जागांवर निवडणूक न लढण्याचा निर्णय याच रणनीतिच्या अंतर्गत घेतला होता. भाजपने 2014 मध्ये 75 उमेदवार उभे केले होते. तर यावेळी पक्षाने 62 जागांवरच निवडणूक लढविली आहे. भाजप जर सर्वात मोठा पक्ष ठरला तर कुठल्याही विलंबाशिवाय अपक्ष अन् छोट्या पक्षांच्या विजयी आमदारांच्या बळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाणार आहे.
जम्मूमध्ये क्लीन स्वीपची अपेक्षा
जम्मू क्षेत्रात मागील वेळेप्रमाणेच स्वीप करणार असल्याची भाजपला अपेक्षा आहे. मागील निवडणुकीत भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपचे संख्याबळ वाढून 28-35 पर्यंत पोहोचू शकते असे पक्षाचे मानणे आहे. तिकीटवाटपात गडबड झाली नसती तर ही संख्या अधिक वाढली असे काही नेत्यांचे मानणे आहे. योग्यप्रकारे तिकीटवाटप न झाल्याने भाजपला जम्मू क्षेत्रात काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीला सामोरे जावे लागले आणि अशा स्थितीत अशा मतदारसंघांमध्ये भाजपला फटका बसण्याचीही शक्यता आहे.
5 नामनिर्देशि आमदारही रणनीतिचा हिस्सा
भाजपची नार काँग्रेसच्या काही बंडखोरांवरही आहे. जे बंडखोर जिंकण्याची शक्यता आहे, त्यांच्याशी भाजप संपर्कात आहे. परंतु काँग्रेस देखील स्वत:च्या बंडखोरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या रणनीतिचा महत्त्वाचा हिस्सा पाच नामनिर्देशित आमदार आहे. नव्या कायद्यानुसार जम्मू-काश्मीर विधानसभेत 5 सदस्यांना उपराज्यपालांकडून नामनिर्देशित केले जाणार आहे. निवडून आलेल्या आमदारांप्रमाणेच त्यांनाही मतदानासमवेत सर्व अधिकार प्राप्त होणार आहेत. यामुळे जम्मू-काश्मीर विधानसभा सदस्यांची एकूण संख्या 95 आणि बहुमताचा आकडा 48 वर पोहोचणार आहे. अशा स्थितीत नामनिर्देशित आमदारांच्या माध्यमातून स्वत:चे संख्याबळ वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
भाजप सरकार स्थापन करणार : चुग
सर्व एक्झिट पोल्समध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु भाजपसाठी निवडणूक निकाल एक्झिट पोलपेक्षा अधिक चांगला राहणार आहे. भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचा दावा भाजपचे महासचिव आणि जम्मू-काश्मीरचे संघटन प्रभारी तरुण चुग यांनी केला आहे.









