किमती वाढवण्याऐवजी वजन कमी करणार ः155 ग्रॅमचा विम बार आता 135 होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशासह जगभरातील बाजारात आता दिवसागणिक महागाईचा आलेख वाढत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा भाग म्हणून अनेक उत्पादक कंपन्या आपापल्या पातळीवर यामध्ये बदल करुन ग्राहकसंख्या घटू नये याकडे कंपन्या विशेष लक्ष देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
खाण्यापिण्याच्या साहित्यासह कपडे आणि चपला आदी महाग होत आहे. यामध्येच एप्रिल महिन्याचा रिटेल महागाई दर 8 वर्षात उच्चांकी पातळीवर पोहोचत तो 7.79 टक्क्यांवर राहिला आहे. साधारणपणे साबण जेवणाचे साहित्य व स्वस्त सिंगल सर्व्हिंग पॅकेटच्या किमती वाढविलेल्या नाहीत. मात्र दरवाढ करण्याऐवजी कंपन्या संबंधीत उत्पादनांचे वजन कमी करण्याची रणनीती आखत आहेत. एकंदर वस्तुंची मागणी कमी होऊ नये यासाठी ही नवी रणनीती असणार आहे.
किमती स्थिरच मात्र उत्पादनात घट
खाद्यतेल, अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या दरम्यान युनिलिव्हर, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि डाबर इंडिया लिमिटेडसह अन्य कंपन्या आपल्या पॅकेट्सच्या किमती स्थिरच ठेवणार असून आतील उत्पादन मात्रेत कपात करणार असल्याची माहिती आहे. हा बदल फक्त भारतात नाही, तर अमेरिकेसह अन्य काही कंपन्या हीच व्युहरचना आखण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
सलग चौथ्या महिन्यात महागाईचा दर तेजीतच
एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर वाढून 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. सदरची ही वाढ सलग चौथ्या महिन्यात कायम राहिली आहे, जो महागाईदर भारतीय रिझर्व्ह बँकेची 6 टक्क्यांच्या वर राहिली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 6.07 टक्के, जानेवारीत 6.01 टक्के आणि मार्चमध्ये 6.95 टक्के राहिला होता. एक वर्षाच्या अगोदर एप्रिल 2021च्या दरम्यान हा महागाई दर 4.23 टक्के होता. ….









