पक्षसंघटनेत आणखी परिवर्तन शक्य, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड आणि पंजाब ही ती चार राज्ये आहेत. याशिवाय मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि केरळ या राज्यांमध्येही नवे प्रदेशाध्यक्ष येत्या काही दिवसांमध्ये नेमले जाऊ शकतात. पक्षसंघटनेत आणखी व्यापक परिवर्तन करण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार असून आगामी काळात चित्र स्पष्ट होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ घातला आहे. या विस्तारात महाराष्ट्रातील शिवसेना आणि राज्य सरकारमध्ये नुकताच समाविष्ट झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा गट यांनाही स्थान मिळू शकते. आपल्या जुन्या मित्रपक्षांशी पुन्हा हातमिळवणी करण्याचा भाजपचा प्रयत्न असून काही पक्षांकडून प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे.
चार राज्यांमध्ये नवे चेहरे
आंध्र प्रदेशात दग्गुबती पुरंदेश्वरी यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली आहे. तसेच सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले जी. किशन रे•ाr यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. बाबुलाल मरांडी या भाजपच्याच जुन्या नेत्याची नियुक्ती झारखंड प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली असून पंजाब प्रदेशअध्यक्षपदी भाजपमध्ये आलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते सुनिल जाखड यांना नेमण्यात आले आहे. तेलंगणात आमदार एटला राजेंदर यांना निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष बांदी संजय कुमार यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अन्य पक्षातून आलेल्यांना सन्मान
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले सुनिल जाखड यांना प्रदेशाध्यक्षपदाचा मान देण्यात आला आहे. जाखड हे काँग्रेसचे दिवंगत केंद्रीय मंत्री बलराम जाखड यांचे पुत्र आहेत. तर तेलंगणात बीआरएसमधून भाजपमध्ये येऊन आमदार म्हणून निवडून आलेले एटला राजेंदर यांना निवडणूक समितीचे अध्यक्षपद देऊन त्यांचाही मान राखण्यात आला आहे. पुरंदेश्वरी या ही पूर्वी काँग्रेसच्याच नेत्या होत्या.
आणखी नवे प्रदेशाध्यक्ष लवकरच
कर्नाटक, गुजरात, केरळ, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि मध्यप्रदेश आदी राज्यांमध्येही नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले जातील अशी शक्यता आहे. काही नावांवर चर्चाही होत आहे. कर्नाटकमध्ये प्रदेशाध्यक्षपद सध्या केंद्रीय मंत्री असणाऱ्या शोभा करंदलाजे यांना किंवा अश्वथ नारायण यांना दिले जाऊ शकते. तर गुजरातमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया किंवा माजी मुख्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमध्ये या पदासाठी डॉ. जितेंद्र सिंग किंवा खासदार जुगल किशोर यांची निवड केली जाऊ शकते आणि मध्यप्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदाचे उत्तरदायित्व नरेंद्र सिंग तोमर किंवा प्रल्हाद पटेल यांच्यावर सोपविली जाण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये कृष्णपाल गुज्जर किंवा राम विलास शर्मा नवे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात, अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूक दृष्टींसमोर…
भारतीय जनता पक्षाने पुढची लोकसभा निवडणूक दृष्टीसमोर ठेवून पक्षसंघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापक परिवर्तन करण्याची योजना सज्ज केली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यायोगे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीच्या प्रचाराचाच अनधिकृतरित्या प्रारंभ केला आहे. मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात आणखी स्थान दिले जाणार असून पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात अजितदादा पवार यांचा गट कर्नाटकात निधर्मी जनता दल आदी पक्षांशी भविष्यकाळात या संदर्भात चर्चा केली जाणे शक्य आहे.









