स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कारेझ व चेक प्रजासत्ताकची खेळाडू मर्केटा व्होन्ड्रोसोव्हाने प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पटकावलेले विजेतेपद ऐतिहासिकच म्हटले पाहिजे. अमेरिकन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना टेनिस जगतात विशेष महत्त्व आहे. यातील ग्रास कोर्टवरील विम्बल्डन स्पर्धा ही सर्वांत जुनी व वैशिष्ट्यापूर्ण म्हणून ओळखली जाते. हिरवळीवर रंगणाऱ्या या स्पर्धेतील सामने पाहणे, अनुभवणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. आजवर अनेक श्रेष्ठतम खेळाडूंनी येथील कोर्टवर आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवत या स्पर्धेला अधिकाधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. महान टेनिसपटू नोव्हॅक जोकोविच आणि अल्कारेझ यांच्यामधील अंतिम लढतही अशीच. वास्तविक या स्पर्धेकरिता जोकोविचचे पारडे जड मानले जात होते. मागच्या चार विम्बल्डन स्पर्धांमध्ये त्याने जेतेपद पटकावत आपला वरचष्मा दाखवून दिला होता. यंदाची ऑस्ट्रेलियन व फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धाही जिंकल्याने प्रबळ दावेदार म्हणून त्याची गणना करण्यात येत होती. अशा भलत्याच फॉर्मात असलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ टेनिसपटूस एका तऊण तडफदार खेळाडूने पाच सेटपर्यंत झुंजवायला लावावे आणि अंतिमत: त्याच्यावर मात करीत एक नवा इतिहास रचावा, याचे मोल निश्चित मोठे आहे. मागच्या दीड ते दोन दशकांचा धांडोळा घेतला, तर टेनिसविश्वावर रॉजर फेडरर, राफेल नदाल व जोकोविच या खेळाडूंचेच वर्चस्व दिसून येते. यातील अभिजात टेनिसपटू असा लौकिक असलेल्या फेडररने अलीकडेच निवृत्ती घेतली आहे. अफाट वेग व उर्जेचा प्रचंड स्रोत अशी ख्याती असलेला राफेल नदालही दुखापतींनी ग्रस्त असल्याने निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे.

तर जोकोविचच्या कारकिर्दीचाही सध्या उत्तरार्ध सुरू असल्याचे पहायला मिळते. आजतागायात या तीन महान खेळाडूंनी मिळूनच जवळपास 65 ग्रँड स्लॅम पदके प्राप्त केली आहेत. फेडररच्या नावावर 20, नदालच्या 22, तर जोकोविचच्या खात्यात 23 पदके आहेत. एकाच कालखंडात तोडीस तोड खेळ खेळणाऱ्या या महान टेनिसपटूंचा वारसा कोण चालविणार, हे आत्ताच सांगता येणार नाही. किंबहुना, अल्कारेझने आपल्यातील उच्चतम गुणवत्ता दाखवून देत नक्कीच अपेक्षा वाढविल्या आहेत. 2022 ची अमेरिकन खुली स्पर्धा जिंकत या तऊण खेळाडूने सर्वप्रथम जगाचे लक्ष वेधून घेतले. हा विजय योगायोग नव्हता, याचेच विम्बल्डनमधील जेतेपद हा नमुना ठरावा. यातील सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे अल्कारेझच्या खेळाचे वैशिष्ट्या होय. त्याच्या खेळात फेडरर, नदाल आणि जाकोविच या तिघांच्याही खेळाच्या छटा आहेत, असे लोक मागच्या वर्षभरापासून म्हणतात. आता दस्तुरखुद्द जोकोविचनेच आपण याचा स्वानुभव घेतल्याचे म्हटले आहे. त्याने आम्हा तिघांमधील सर्वोत्तम गुण घेतले आहेत. इतक्या कमी वयातील त्याची मानसिकता वाखाणण्याजोगी आहे, असे जोकोविच म्हणतो. फेडररच्या खेळात एकप्रकारची नजाकत नि विशुद्धता व तंत्रशुद्धता आहे. आजही त्याच्याइतका दुसरा लोकप्रिय खेळाडू नसावा. जबरदस्त वेग, अचूक फटके व असामान्य उर्जेसाठी नदाल प्रसिद्ध. तर जोकोविच म्हणजे टायमिंग व वैविध्यपूर्ण फटक्यांचा बादशहा. अवघ्या 20 वर्षांच्या अल्कारेझच्या खेळात या तिन्ही खेळाडूंच्या कौशल्यांचा त्रिवेणीसंगम घडणे, ही आशादायक बाब ठरावी. अर्थात त्याच्या टेनिसमध्ये स्वत:च्या म्हणूनही छटा, पैलू आहेत. प्रदीर्घ व यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी विविध प्रकारच्या कोर्टशी तसेच परिस्थितीशी संबंधित खेळाडूस जुळवून घ्यावे लागते. ही क्षमता या नव्या विजेत्यामध्ये आहे, यात कोणताही संदेह नाही. नदाल टेनिसला रामराम ठोकण्याच्या मार्गावर असताना आपल्या देशातूनच एका प्रतिभावान टेनिसपटूचा उदय व्हावा, याचे त्यालाही समाधान असणार. या विजयासह अल्कारेझने जागतिक क्रमवारीतील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. भविष्यात हे स्थान टिकविण्याचे आव्हान त्याच्यापुढे असेल. कोणत्याही खेळामध्ये सातत्य अत्यंत महत्त्वाचे असते. ते राखण्याकरिता खेळातील उणिवा वेळीच सुधारताना आपली म्हणून बलस्थाने निर्माण करावी लागतात. संयम, शारीरिक व मानसिक कणखरता आणि तंदुऊस्ती याही महत्त्वाच्या बाबी होत. आपल्या कारकिर्दीला वळण लावण्याकरिता टेनिसच्या क्षितिजावरील या नव्या ताऱ्यास याकडेही लक्ष द्यावे लागेल. ही स्पर्धा जिंकून टेनिस सम्राज्ञी मार्गारेट कोर्ट हिच्या विक्रमी 24 ग्रँड स्लॅम पदकांशी बरोबरी करण्याची जोकोविचची संधी हुकली असली, तरी त्याचे टेनिस अजून बाकी आहे. त्यामुळे पुढच्या टप्प्यात नवा विक्रम करण्यासाठी तो सज्ज असेल. दुसऱ्या बाजूला विम्बल्डनमधील मर्केटा हिचा खेळही अविस्मरणीय म्हणता येईल. खरे तर या स्पर्धेकरिता तिला कोणतेही मानांकन नव्हते. सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश करणारी जाबेऊरला हीच विजयी होईल, अशीच साऱ्यांची धारणा होती. प्रत्यक्षात बिगरमानांकित मर्केटाने तिला पराभूत करीत आपला दर्जा दाखवून दिला, हे कौतुकास्पदच आहे. या पूर्वी 2019 मध्ये ती फ्रेंच टेनिस स्पर्धेत उपविजेती ठरली होती. मागच्या वर्षी दुखापतीमुळे तिला काही काळ टेनिसमधून ब्रेक घ्यावा लागला. त्यातून पुनरागमन करीत तिने घेतलेली झेप थक्क करणारी म्हणावी लागेल. जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर असलेल्या या टेनिसपटूकडूनही आगामी काळात सातत्यपूर्ण खेळाची अपेक्षा असेल. टेनिस हा एक अद्भुत खेळ आहे. तो सांघिक नसला, तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. या खेळातून रसिकांना, चाहत्यांना जो आनंद मिळतो, तो अवर्णनीय असाच. खेळाडू बदलतात, पिढ्या बदलतात, मात्र या खेळाची लज्जत कमी होत नाही. उलट नव्या खेळाडूंशी पुन्हा नवी जुनी-पिढी जोडली जाते. अर्थात काळ बदलला, तरी बोर्ग, सॅम्प्रस, आगासी, बेकर, मार्गारेट कोर्ट, मार्टिना, स्टेफी, मोनिका सेलेस, विल्यम भगिनी यांचा खेळ कोण विसरेल? जुने ते सोने नि नवे ते हवे, हे मानवी आयुष्याचे सारच. आता जुन्यांची आठवण ठेवत नव्या ताऱ्यांच्या चमचमण्याचा आनंद घेऊया.








