विशेष प्रतिनिधी /पणजी
राज्यात गौण खनिज अंतर्गत वाळू, खडी, चिरे यांची शेजारील राज्यातून आयात करण्यासाठी नवी नियमावली गोवा खाण संचालनालयाने जाहीर केला आहे.
खाण संचालक डॉ. सुरेश शानभाग यांनी सोमवारी सायंकाळी परिपत्रक जारी केले असून गोवा गौण खनिज 1985 च्या कलम 47 अन्वये खाण खात्याकडून ट्रान्झिट परमीट घेणे सक्तीचे केले आहे. परवाना असल्याशिवाय वाळू, खडी, चिरे शेजारील राज्यातून गोव्यात आणता येणार नाहीत. आज दि. 27 सप्टेंबरपासून खाण खात्याच्या वेबसाईटवरून ऑनलाईन परवाने प्राप्त करता येतील, त्यासाठी अगोदर जे वाहन यासाठी वापरले जाईल त्याची नोंदणी खाण खात्यात करणे तेवढेच आवश्यक आहे. खाण खाते 24 तासांच्या आत परवाने जारी करतील. शनिवार व रविवार व सुट्टींचे दिवस वगळून इतर दिवशी 24 तासांच्या आत परवाने जारी केले जाणार आहेत.
मात्र चेकपोस्टवर वाहतूक खात्याचे अधिकारी बसतील व तिथे तपासणी करतील. तथापि सध्या चेकपोस्टवर हाताने लिहून देण्यात येणारे परवाने 3 ऑक्टोबर नंतर रद्द केले जातील आणि ऑनलाईन परवानेच सक्तीचे रहातील.









