आणण्याची तयारी : अभ्यासक्रमांमध्ये मोठे बदल होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात 9 टीचिंग केर्ससाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमांवर आज म्हणजेच बुधवारी शिक्कामोर्तब होणार आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या (एनसीटीई) प्रशासकीय व्यवस्थेची बैठक होणार असून यात नव्या नियमांना अंतिम रुप दिले जाणार आहे. मसुदा नियमनांवर 7 हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या असून प्रत्येक सुचनेचे विश्लेषण केले जात आहे. मिळालेल्या फीडबॅकच्या प्रत्येक पैलूला अभ्यासण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कुठल्या सूचनांना नव्या नियमनांमध्ये सामील करावे याचा निर्णय घेणार आहे. त्यानंतरच अंतिम नियम समोर येतील अशी माहिती एनसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक पंकज अरोडा यांनी दिली आहे.
प्रशासकीय व्यवस्थेच्या मंजुरीनंतर नव्या नियमांना मंजुरीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे पाठविले जाईल. नव्या नियमांमध्ये टीचिंग कोर्समध्ये मोठ्या बदलांचा रोडमॅप आहे. यात प्रत्येकी एक वर्षासाठी बी.एड (बॅचलर ऑफ एज्युकेशन) आणि एम.एड (मास्टर ऑफ एज्युकेशन) अभ्यासक्रमासह मास्टर ऑफ एज्युकेशन प्रोग्राम (पार्टटाइम)ची वापसी सुनिश्चित होऊ शकेल. मिळालेल्या फीडबॅकमध्ये अतिरिक्त पात्रता अटी सामील करण्याचा मुद्दा सामील असल्याचे अरोडा यांनी सांगितले.
2026 पासून टीचिंग प्रोग्राममध्ये बदल
2026 पासून भारतात टीचिंग प्रोग्राममध्ये मोठे बदल होणार आहेत. 4 वर्षांच्या इंटीग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) कोर्समध्ये नव्या शाखा जोडण्यात आल्या आहेत. हे 9 अभ्यासक्रम 2026 च्या तुकडीपासून लागू होतील. 15 सदस्यीय तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून यात काही सदस्य प्रशासकीय व्यवस्थेचे देखील आहेत. बुधवारच्या बैठकीत टीचिंग प्रोग्रामच्या नव्या रोडमॅपवर शिक्कामोर्तब केले जाईल असे अरोडा यांनी सांगितले आहे.
अभ्यासक्रम शुल्क नियमन
एनसीटीईने नव्या नियमांमध्ये शुल्क संरचनेवरही मोठा भर दिला आहे. कुठलीही टीचिंग इन्स्टीट्यूट विद्यार्थ्यांकडून डोनेशन किंवा कॅपिटेशन फी स्वीकारू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. टीचिंग इन्स्टीट्यूट संबंधित केंद्र किंवा राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलेले शुल्कच विद्यार्थ्यांकडून आकारू शकणार आहे. एखाद्या संस्थेच्या विरोधात शुल्कावरुन तक्रार प्राप्त झाल्यास ती संबंधित विद्यापीठाकडे वर्ग केली जाते. विद्यापीठावर आवश्यक कारवाई करावी लागणार आहे. विद्यार्थी किंवा पालकांनी शुल्कावरुन कुठलीही तक्रार केली तर कारवाई करावी लागणार आहे. शुल्कप्रकरणी मनमानी करण्यापासून रोखले जाणार आहे. देशात टीचिंग प्रोग्रामच्या गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची समस्या होणार नाही हे पाहिले जाणार असल्याचे एनसीटीईचे सांगणे आहे.









