नववर्षाचे जल्लोषी स्वागत : शहरात डीजे ठेका अन् आतषबाजी
बेळगाव : नवीन संकल्प उराशी बाळगत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे बेळगावच्या नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत शहरात सर्वत्र नववर्षाचा आनंद दिसून आला. विशेषत: कॅम्प भागामध्ये ओल्डमॅनच्या प्रतिकृती दहन करून डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. सर्वत्र सुरू असलेल्या पार्ट्यांमुळे रात्रभर नागरिकांची ये-जा सुरूच होती. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. आठवडाभरापूर्वीपासून पार्ट्यांचे नियोजन सुरू होते. बऱ्याच जणांनी गोवा, कोकणात जाऊन नववर्षाचा आनंद साजरा केला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गर्दी झाली होती.
काही हॉटेल्सनी डीजे नाईट्स पार्ट्यांचे आयोजन केले होते. कुटुंबांसाठी वेगळी सवलत देण्यात आल्याने तरुणांसह कुटुंबांसमवेत हॉटेलमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. रात्री 12 च्या सुमारास ओल्डमॅनचे दहन करण्यात आले. यावर्षी शहरात 25 फुटांपर्यंत उंच ओल्डमॅन तयार करण्यात आले होते. राक्षसांप्रमाणे त्यांना मुखवटे परिधान करण्यात आले. कॅम्प परिसरात चिमुकल्यांची गर्दी होती. पालकांसमवेत चिमुकल्यांचा उत्साह दिसून आला. प्रत्येकालाच हॉटेलमध्ये जाऊन नववर्षाचे स्वागत करणे शक्य नसते. त्यामुळे काही जणांनी कुटुंबासमवेत घरामध्येच हा आनंद साजरा केला. काहींनी शाकाहारी तर काहींनी मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. काही ठिकाणी नववर्षासाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारायण प्रवचन यासह मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करून वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला.
हॉटेल्स चालकांना सुगीचे दिवस
थर्टीफस्टमुळे हॉटेल चालकांना सुगीचे दिवस आले होते. खाद्यपदार्थांच्या ऑर्डरसोबत किलोप्रमाणे मटण, चिकन बिर्याणी यांच्या ऑर्डर देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर घरगुती खानावळींमध्ये जेवण तसेच चपाती भाकरी करून घेण्यासाठी गर्दी झाली होती. बुधवारी पहाटेपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी दिसून आली.
हुल्लडबाजांमुळे नागरिकांना त्रास
शहरात एकीकडे नववर्षाचा उत्साह सुरू होता तर काही हुल्लडबाज तरुणांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वेगाने वाहने चालविणे, विनाकारण मोठ्याने घोषणा देणे, मद्याच्या बाटल्या फोडणे, यासह अनेक विचित्र प्रकार करण्यात येत होते. महिलांची छेड काढण्याचे प्रकार घडल्याने स्थानिकांनी चांगलाच प्रसाद दिला. त्यामुळे या हुल्लडबाजांमुळे नागरिकांना वेठीस धरण्यात आले.









