वृत्तसंस्था/ रांची
35 किमी चालण्याच्या शर्यतीत राम बाबू व मंजू राणी यांनी पुरुष व महिलांमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवताना येथे झालेल्या राष्ट्रीय रेस वॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
पंजाबचे प्रतिनिधित्व करणारी 23 वर्षीय मंजू 35 किमी रेसवॉकमध्ये तीन तासापेक्षा कमी अवधी घेणारी पहिली भारतीय महिला बनली आहे. तिने ही शर्यत 2ः57.54 सेकंदात पूर्ण करीत 3ः00.04 सेकंदाचा आधीचा विक्रम मोडित काढला. गेल्या वर्षी रमणदीप कौरने हा विक्रम नोंदवला होता. उत्तराखंडच्या पायलने रौप्य व उत्तर प्रदेशच्या वंदना पटेलने कांस्यपदक मिळविले.

उत्तर प्रदेशच्या राम बाबूने आपला स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम सुधारताना 2ः36.34 से. नवा विक्रम नोंदवला. सुमारे पाच मिनिटे कमी वेळेत ही शर्यत त्याने पूर्ण केली. मात्र दोघांनाही विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप पात्रतेची मर्यादा (2ः29.40, पुरुष) व (2ः51.30, महिला) त्यांना गाठता आली नाही. विद्यमान विजेत्या जुनेद खानला रौप्य व चंदन सिंगला कांस्यपदक मिळाले. 35 किमी रेसवॉक ही शर्यत 2021 पासून भारतात सुरू करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर 50 किमी रेसवॉक शर्यत वर्ल्ड ऍथलेटिक्सने रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा प्रकार सुरू करण्यात आला आहे.









