वार्षिक आधारावर 12.6 टक्के वाढ : एप्रिल 2024 मध्ये होते 2.10 लाख कोटी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाने मोठा पल्ला गाठत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. एप्रिलमधील जीएसटी संकलन 2.37 लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. वार्षिक आधारावर पाहिले तर एप्रिल 2025 मध्ये अप्रत्यक्ष कर संकलनात 12.6 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2025 च्या सुरुवातीला जीएसटी संकलन 1.96 लाख कोटी रुपये होते. त्यामध्ये वार्षिक आधारावर 9.9 टक्के वाढ झाली. 2024 च्या वर्षअखेरीस म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जीएसटी संकलनात मंदी दिसून आली. पण यानंतर, यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान पुन्हा संकलन वाढत आहे. यावर्षी जीएसटी संकलनातील वाढ दुहेरी अंकात होण्याची ही दुसरी वेळ आहे. 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर एप्रिल 2024 मध्ये जीएसटी संकलन 2.10 लाख कोटी रुपये होते. हा आकडा आतापर्यंतचा विक्रमी म्हणून गणला जात होता. मात्र, आता एप्रिल 2025 मधील 2.27 लाख कोटी रुपये ही सर्वोच्च पातळी नोंद झाली आहे.
देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा जीएसटी महसूल 10.7 टक्क्याने वाढून सुमारे 1.9 लाख कोटी रुपये झाला, तर आयात केलेल्या वस्तूंमधून मिळणारा महसूल 20.8 टक्क्याने वाढून 46,913 कोटी रुपये झाला. एप्रिलमध्ये परतावा जारी करण्याचे प्रमाण 48.3 टक्क्याने वाढून 27,341 कोटी रुपये झाले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला देशांतर्गत स्रोतांकडून दमदार खरेदी झाल्यामुळे जीएसटी संकलन 9.1 टक्क्यांनी वाढून 1,83,646 कोटी रुपये झाले होते. जानेवारीमध्ये जीएसटी संकलन 1.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 12.3 टक्क्यांनी जास्त आहे. त्यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.77 लाख कोटी रुपये होते. फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात यावर्षी जीएसटी महसुलात 11 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये, केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरासह एकूण 11.78 लाख कोटी रुपये संकलन होण्याचा अंदाज आहे.









