शेळी – लोलये येथून मिरवणुकीने श्री बेताळ देवालयी आगमन, शेकडो भाविकांचा सहभाग
प्रतिनिधी /काणकोण
दर तीन वर्षांनी महालवाडा, पैंगीण येथे होणारी गडय़ांची जत्रा यंदा 21 मे रोजी होणार असून या जत्रेसाठी लागणारा लाकडी खांब शेळी, लोलये येथून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात 24 रोजी महालवाडा येथील श्री बेताळ देवालयात आणण्यात आला.
शेळी येथील एका जमीनदाराच्या मालकीच्या जमिनीवरील हा खांब असून गडय़ांच्या जत्रेसाठी खोडगूस किंवा अटंब या जातीच्या लाकडाचाच वापर केला जातो. उघडय़ावर पाऊस आणि ऊन-वाऱयाचा मारा सोसणाऱया या खांबाच्या आधारावर जास्तीत जास्त चार गडय़ांच्या जत्रा होऊ शकतात. त्यामुळे दर जत्रेच्या वेळी खांबाची क्षमता पाहून खांब बदलावा लागतो, अशी माहिती श्री परशुराम पंचैग्राम देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर यांनी दिली.
पैंगीणच्या गडय़ांच्या जत्रेत विविध जातींच्या लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो आणि केवळ भाविकांचा उत्साह आणि काम करण्याची तयारी याच आधारावर गेली कित्येक शतके हा उत्सव चालू आहे. यापूर्वी खोल, खोतीगावसारख्या दूरच्या भागांतून देखील खांब आणण्यात आलेले आहेत आणि दरवेळी भाविकांनी उत्साह आणि उमेद दाखविलेली आहे. यंदाही भाविकांनी असाच उत्साह दाखविला आहे. भाविकांची उमेद आणि उत्साह हेच या त्रिगामातील उत्सवाचे मुख्य वैशिष्टय़ असल्याचे मत प्रभुगावकर यांनी व्यक्त केले.
गडय़ांच्या जत्रेच्या वेळी गडय़ांना बांधण्यासाठी जे रहाट केले जाते आणि जी फळी वापरण्यात येते त्यासाठी दाभण, कारो, गाळयी, घोडूकसारख्या लाकडांचा वापर परंपरेने होत आला आहे आणि मागच्या कित्येक शतकांचा विचार करता त्यात खंड पडलेला नाही. पैंगीण, लोलये आणि खरेगाळी या त्रिगामांतील हा प्रमुख उत्सव असून केवळ लोकाश्रयावर आणि श्री बेताळ देवावरील श्रद्धेवर तो आजवर चालत आलेला आहे. हा खांब श्री बेताळ देवालयात पोहोचल्यानंतर त्याचदिवशी त्याची उभारणी करण्यात येते. श्री बेताळ देवावरील श्रद्धा व भाविकांचा उत्साह यामुळे कार्य सिद्धीस नेण्यात काहीच अडचण येणार नाही, असे अध्यक्ष प्रभुगावकर यांनी सांगितले.
शेळी, माशे, कारय, पैंगीण या मार्गाने महालवाडा येथील श्री बेताळ देवालयी या खांबाचे आगमन झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी एकच जल्लोष केला आणि त्याचदिवशी खांब उभारण्यात आला. याकामी सहकार्य केलेल्या सर्वांबद्दल श्ऱी परशुराम पंचैग्राम देवस्थान समितीने कृतज्ञता व्यक्त केली आहे.









