संसदेचे नवे भवन 150 वर्षांहून अधिक काळ वापरयोग्य राहणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. नव्या संसदेत जुन्या संसदेच्या तुलनेत अधिक खासदार सामावले जाऊ शकणार आहेत. नव्या संसद भवनाच्या लोकसभेत एकाचवेळी 888 खासदारांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्यससभेत एकाचवेळी 348 खासदार बसू शकणार आहेत. जुन्या इमारतीत संयुक्त अधिवेशनाचे आयोजन सेंट्रल हॉलमध्ये केले जात होते, परंतु नव्या भवनात याचे आयोजन लोकसभेत केले जाणार आहे. यात गरज भासल्यास एकाचवेळी 1200 हून अधिक खासदार बसू शकणार आहेत.
त्रिभुजाकार असलेल्या चारमजली संसद भवनात संविधान भवन देखील असणार आहे, ज्यात मूळ संविधान आणि डिजिटल स्वरुपातील संविधान ठेवले जाणार आहे. या चारमजली नव्या वास्तून केंद्रीय मंत्र्यांची कार्यालये आणि समिती कक्ष असणार आहेत. तसेच नव्या वास्तूत सेंट्रल लाउंज देखील तयार करण्यात आला आहे.
त्रिभुजाकार असलेल्या चारमजली संसद भवनाचे निर्मितक्षेत्र 64,500 चौरस मीटर आहे. भवनाचे तीन मुख्य द्वार असून यात ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार आहे. यात व्हीआयपी, खासदार आणि अतिथींसाठी वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत.
संसद भवनाच्या निर्मितीकरता वापरण्यात आलेली सामग्री देशाच्या विविध भागांमधून आणली गेली आहे. प्रत्येक खासदाराच्या आसनासमोर ऑडिओ आणि व्हिडिओ सिस्टीम बसविण्यात आली आहे. याचे नियंत्रण सभापतींकडे असणार आहे.
नव्या संसदेत ऐतिहासिक राजदंड ‘सेंगोल’ला लोकसभा अध्यक्षांच्या आसनासमीप स्थापित करण्यात आले आहे. लोकसभा कक्षाला राष्ट्रीय पक्षी मोराच्या थीमवर तर राज्यसभा कक्षाला राष्ट्रीय फुल कमळाच्या थीमवर तयार करण्यात आले आहे.
संसदेचे जुने भवन सुमारे 6 वर्षांच्या कालावधीत तयार करण्यात आले होते. तर नवे भवन 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत तयार करण्यात आले आहे. जुने भवन वर्तमान आवश्यकतांसाठी अपुरे मानले गेले. तसेच जुन्या संसद भवनात आसनव्यवस्था अपुरी पडू लागली होती. याचमुळे नवे संसद भवन तयार करण्यात आले आहे. 566 मीटर व्यासमध्ये तयार करण्यात आलेल्या जुन्या भवनात लोकसभेत 550 तर राज्यसभेत 250 सदस्यांसाठी आसनक्षमता आहे. सुमारे 100 वर्षे जुन्या या भवनात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकांदरम्यान अधिक जागेची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती.
सेंट्रल हॉलच्या धर्तीवर सेंट्रल लाउंज
नव्या संसद भवनात एक सेंट्रल लाउंज तयार करण्यात आला असून ज्याल जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलसारखे मानले जाऊ शकते. या लाउंजमध्ये बसून खासदार परस्परांशी संवाद साधू शकतात. दोन्ही सभागृहामंध्ये बाहेर पडत खासदार या लाउंजमध्ये पोहोचू शकणार आहेत. तर नव्या संसदेच्या भवनातील कोर्टयार्डमध्ये राष्ट्रीय वृक्षाची लागवड करण्यात आली आहे.









