विविध राज्यांतील निमंत्रितांचे दिल्लीत आगमन : पंतप्रधानांना सुवर्ण राजदंड भेट देण्यासाठी चेन्नईतील संतमंडळीही दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी 12 वाजता नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विविध राज्यांतील पाहुण्यांचे आगमनही सुरू झाले आहे. उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांना सुवर्ण राजदंड (सेंगोल) भेट देण्यासाठी चेन्नईच्या धर्मपुरम अधिनाम येथील 21 संत देखील चेन्नईहून दिल्लीत पोहोचले आहेत. या संतांनी पंतप्रधानांसाठी खास भेटही आणली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाचा व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ 1.48 सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ खूप ‘लाईक’ केला जात आहे. या व्हिडिओमध्ये नवीन इमारत अतिशय सुंदर दिसत असून सभापतींच्या आसनाजवळ ठेवलेला सेंगोलही दिसत आहे.
नव्या संसद भवनात अनेक झलक पाहायला मिळत आहे. त्यात देशातील विविध ठिकाणांचे चित्रण करण्यात आले आहे. नवीन संसद भवनात प्रवेश करण्यासाठी तीन मुख्य दरवाजे आहेत. पहिले ज्ञानाचे द्वार, दुसरे शक्तीचे द्वार आणि तिसरे कृतीचे द्वार अशी रचना करण्यात आली आहे. इमारतीच्या मुख्य गेटवर सत्यमेव जयते लिहिलेले असून त्यावर अशोकचक्रही बसवले आहे. संसद भवनातील लायटिंग आणि इंटीरियर डिझाईन उत्कृष्ट आहे. नवीन इमारत सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग असून डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याची पायाभरणी करण्यात आली. नवीन इमारतीत 1,272 सदस्य (888 लोकसभा, 384 राज्यसभा) बसण्याची क्षमता आहे.
होमहवनानंतर 12 वाजता उद्घाटन
नूतन संसद वास्तूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माध्यान्ही 12 वाजता होणार आहे. त्यापूर्वी सकाळी परिसरात होमहवन केले जाईल. वास्तूपूजनही केले जाणार आहे. उद्घाटनानंतर, या संसद भवनाचे निर्माणकार्य केलेल्या श्रमयोगींचा सत्कार केला जाणार आहे. नव्या संसद भवनाचे निर्मितीकार्य 60 हजार श्रमयोग्यांनी विक्रमी द्रुतगतीने केले आहे. त्यामुळे उद्घाटन कार्यक्रमात त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात येणार आहे. त्यांचे योगदान या कार्यात सर्वात महत्त्वाचे आहे, याची जाणीव सरकारला असून त्यामुळेच त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राजदंड 75 वर्षांनंतर संसदेत
उद्घाटन कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग राजदंडाची संसदेत स्थापना हा आहे. इंग्रजांनी हा राजदंड स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही काळ आधी नेहरुंच्या हाती सोपविला होता. मात्र, तो संसदेत स्थापन न करता, प्रयागराज येथील वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आला होता. आता तो नव्या संसद सदनातील लोकसभेत लोकसभाध्यक्षांच्या आसनानजीक स्थापित केला जाणार आहे. त्याची स्थापनाही वैदिक पद्धतीने मंत्रोच्चारांमध्ये केली जाणार आहे.
महाराष्ट्रीयन सागवानी लाकूड
संसद भवनात वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणण्यात आले आहे. तर संसदेत बसवण्यात आलेले फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले होते. राजस्थानातील राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. पांढरे आणि लाल दगड राजस्थानमधील सरमथुरा येथून आणले आहेत. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून गालिचा मागविण्यात आला असून आगरतळा येथून बांबूचे लाकूड आणले आहे. नव्या इमारतीत बसवलेले अशोकचक्र मध्यप्रदेशच्या इंदूरहून आणले आहे. याशिवाय महाराष्ट्रातून काही फर्निचर आणले आहे. राजस्थानमधील अंबाजी येथून पांढरा संगमरवर आणला आहे.
प्रादेशिक संतुलन…
सागवान लाकूड नागपूर-विदर्भ भागातील
फर्निचर निर्मितीचे बहुतांश काम मुंबईत
उदयपूर येथून मागवला भगवा-हिरवा दगड
राजस्थान-अंबाजी येथील पांढरा संगमरवर
स्टील स्ट्रक्चर दमण-दीव येथून आयात
फ्लोअरिंगसाठी त्रिपुरातील बांबूंचा वापर
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील गालिचा
लाल-पांढरा वाळूचा खडक राजस्थानमधील
बांधकामाला वापरलेली वाळू हरियाणातील









