कोल्हापूर / कृष्णात चौगले :
राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी साखर कारखान्यातील कार्यकारी संचालक निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. या निवड प्रक्रियेमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार न्यायालयात गेल्यामुळे अंतिम निकाल प्रलंबित ठेवला होता. अखेर 20 जानेवारी 2025 रोजी अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे दाखले वादी व प्रतिवादींनी न्यायालयात सादर करून जोरदार युक्तिवाद केला. यामध्ये निवड प्रक्रियेस आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी फेटाळली. त्यामुळे कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेचे अंतिम निकाल अखेर सोमवारी जाहीर केला. यामध्ये 50 कार्यकारी संचालकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल तयार करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाकडून 31 मे 2022 रोजी सविस्तर परिपत्रक जाहीर केले होते. वेगाने बदलणाऱ्या राज्यातील साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षमपणे पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संकल्पनेतून कार्यकारी संचालकांच्या पॅनेल परीक्षेत अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता. या निर्णयानुसार कार्यकारी संचालकांची परीक्षा प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय झाला होता.
पहिल्या टप्प्यातील चाचणी परीक्षा 5 एप्रिल 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा 4 मे 2024 रोजी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी परीक्षा 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान, पुणे येथे घेण्यात आल्या. मौखिक चाचणी परीक्षा चालू असतानाच लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी निवड प्रक्रिया सदोष असल्याचे कारण पुढे करून मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल करून निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते. सदर याचिकेवर सविस्तर प्राथमिक सुनावणी होऊन औरंगाबाद उच्च न्यायालयाने 18 जुलै 2024 रोजी आदेश पारित करून मौखिक चाचणी परीक्षा घेण्यास अनुमती दिली होती. पण लेखी परीक्षेतील उमेदवारांचे गुण बंद लिफाफ्यामध्ये उच्च न्यायालयात सादर करण्याचे व परीक्षेचे अंतिम निकाल प्रसिद्ध न करण्याच्या सूचना साखर आयुक्त कार्यालय व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान यांना दिले होते. त्यानंतर सदर याचिकेवरील सुनावणी वेळोवेळी लांबणीवर पडली. अखेर उच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी सदर याचिक फेटाळल्यामुळे कार्यकारी संचालक निवडीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
- सद्यस्थितीत राज्यात केवळ 69 कार्यकारी संचालक कार्यरत
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची संख्या 107 असून बहुराज्यीय सहकारी साखर कारखान्यांची संख्या 11 इतकी आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची जबाबदारी महत्वाची आहे. यापूर्वी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर कार्यकारी संचालक पदी काम करण्यासाठी सन 2005 मध्ये 66 आणि सन 2015 मध्ये 100 कार्यकारी संचालकांचे पॅनेल तयार करण्यात आले होते. त्यापैकी सद्य:स्थितीत एकूण 69 कार्यकारी संचालक विविध सहकारी साखर कारखान्यांवर कार्यरत आहेत.
- नवीन कार्यकारी संचालक महत्वाची भूमिका बजावतील
कार्यकारी संचालकांच्या निवडीबाबत 2022 ते 2025 पर्यंत चाललेल्या प्रक्रियेने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ज्याचा शेवट न्यायालयीन निकालातून झाला आहे. निवड झालेले 50 उमेदवार राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील. साखर उद्योगासमोरील सध्याच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिल.
पी.जी.मेढे, साखर उद्योग तज्ञ








