इलॉन मस्क यांच्याकडून नवे नियम जाहीर : ‘डेटा स्क्रॅपिंग’मुळे निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या वापरावर नवे निर्बंध लागू केले असून वापरकर्त्यांसाठी ट्विट पाहण्याची मर्यादा निश्चित केली आहे. आता नॉनव्हेरिफाईड अकाउंट्स एका दिवसात फक्त 600 ट्विट वाचू शकतील. तर सत्यापित म्हणजेच व्हेरिफाईड खाती एका दिवसात 6000 पोस्ट वाचण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, नवीन नॉनव्हेरिफाईड खाती एका दिवसात केवळ 300 पोस्ट वाचण्यास सक्षम असतील. मस्क यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी मध्यरात्री यासंबंधी नियम जाहीर केले असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ प्रभावाने सुरू केली आहे.
ट्विटरने अकाऊंट नसलेल्या ग्राहकांसाठी आपल्या वेब प्लॅटफॉर्मवर ब्राउझिंग प्रवेश बंद केला आहे. ट्विट पाहण्यासाठी वापरकर्त्यांना आधी खाते तयार करावे लागेल, असेही इलॉन मस्क यांनी जाहीर केले. ‘डेटा स्क्रॅपिंग’मुळे हा निर्णय सध्या घेण्यात आला असला तरी त्यात बदल होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये व्हेरिफाईड अकाउंट्ससाठी लवकरच 8000, असत्यापित खात्यांसाठी 800 आणि नव्याने व्हेरिफाईडसाठी 400 अशी दर मर्यादा असतील, असे संकेतही दिले.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतल्यापासून बरेच फेरबदल केले आहेत. जेव्हा जेव्हा मस्क यांची टीम बदल करते तेव्हा गोंधळाचे वातावरण तयार होते. आता नव्याने जाहीर केलेल्या नियमांमुळेही ट्विटर वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वापरकर्त्यांना ट्विट पाहण्यास मर्यादा घातल्यामुळे अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या जगभरातील वापरकर्ते रेट लिमिट ओलांडलेले मेसेज मिळत असल्याची तक्रार करत आहेत. याचा अर्थ असा की ग्राहकांनी एका दिवसात पोस्ट पाहण्याची मर्यादा पूर्ण केली आहे आणि आता तुम्ही आज नवीन पोस्ट पाहू शकत नाही, असा होत आहे.
मर्यादेत दोनदा सुधारणा
ट्विटरने आपल्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केलेला आहे. यापूर्वी सत्यापित, असत्यापित आणि नवीन असत्यापित खात्यांसाठी एका दिवसात पोस्ट पाहण्याची मर्यादा अनुक्रमे 10 हजार, 5 हजार आणि 500 आहे. नव्या नियमानुसार त्यात मोठी कपात करण्यात आली असून डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनच्या संदर्भात ट्विटरला हे पाऊल उचलावे लागले आहे.
आमचा डेटा लुटला जातोय… : मस्क
ट्विटरचे मालक मस्क यांनी एक ट्विट करताना आपला डेटा इतका लुटला जात आहे की सामान्य वापरकर्त्यांसाठी ही एक अपमानजनक सेवा वाटत असल्याचे म्हटले आहे. जागतिक पातळीवर काम करणारी जवळपास प्रत्येक कंपनी मोठ्या प्रमाणात डेटा स्क्रॅप करत होती. यामध्ये स्टार्टअप्सपासून ते मल्टिनॅशनल कॉर्पोरेशनपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश असल्याचा दावा ट्विटरकडून करण्यात आली आहे.