वृत्तसंस्था/लखनौ
उत्तरप्रदेश सरकारने 1978 च्या संभल येथील दंगलींप्रकरणी नव्याने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. याचबरोबर पोलिसांना एका आठवड्याच्या आत अहवाल सोपविण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांना गृह विभागाच्या उपसचिवांकडून एक पत्र मिळाले असून यात चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नियुक्त करण्यात आल्याचे नमूद आहे. याचबरोबर पोलीस अधीक्षकांनी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना पत्र लिहून संयुक्त चौकशीसाठी एक प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली आहे. उत्तरप्रदेश विधान परिषदेचे सदस्य श्रीचंद शर्मा यांनी संभल येथे 1978 मध्ये झालेल्या दंगलींच्या चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या गृह विभागाचे उपसचिवांकडून पत्र मिळाले आहे. अशास्थितीत या चौकशीत पोलिसांच्या वतीने या चौकशीत संभलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सामील असतील, असे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे.
मोठ्या प्रमाणात हिंसा अन् जाळपोळ
संभलमध्ये 1978 च्या दंगलीत मोठ्या प्रमाणात हिंसा, जाळपोळ झाली होती आणि यामुळे अनेक हिंदू परिवारांना विस्थापित व्हावे लागले होते. दंगलीदरम्यान अनेक हिंदू मारले होते, अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. दंगलीच्या चौकशीची मागणी ही संभलमध्ये प्राचीन कार्तिक महादेव मंदिर पुन्हा खुले झाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. हे मंदिर मागील 46 वर्षांपासून बंद होते. मंदिर पुन्हा खुले करण्याचा निर्णय 24 नोव्हेंबर रोजी शाही जामा मशिदीत एका सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसेनंतर घेण्यात आला होता.









