आणखी एका वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे लवकरच उद्घाटन
बेळगाव : वैमानिक प्रशिक्षण देणारे शहर म्हणून बेळगावची नवी ओळख निर्माण होत आहे. एअरफोर्स या वैमानिक प्रशिक्षणासोबतच बेळगावमध्ये खासगी प्रशिक्षण संस्थाही सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत. सांबरा येथील विमानतळावर सुरू झालेल्या एका प्रशिक्षण केंद्रानंतर येत्या काही दिवसांत दुसरे प्रशिक्षण केंद्रही सुरू होत आहे. त्यामुळे देशातील एक वैमानिक प्रशिक्षण हब म्हणून बेळगावची ओळख निर्माण होत आहे. केंद्रीय नागरी हवाई उ•ाण मंत्रालयाच्यावतीने 2 टायर व 3 टायर शहरांमध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाच्या विमानतळावर खासगी संस्थांना प्रशिक्षणाची सेवा दिली जाणार होती. या अंतर्गत बेळगाव येथील सांबरा
विमानतळावर दोन फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मंजूर झाल्या. दिल्ली येथील रेडबर्ड तर बेंगळूर समवर्धने या दोन कंपन्यांना एफटीओ मंजूर झाले. कोरोना काळात संथगतीने एफटीओचे काम सुरू होते. सांबरा येथील विमानतळाच्या खुल्या जागेत 5 हजार चौरसमीटर जागा भाडेतत्वावर देण्यात आली. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर हा करार करण्यात आला. एफटीओच्या जागेपासून मुख्य धावपट्टीपर्यंत टॅक्सी ट्रॅकचे बांधकाम करण्यात आले. काँक्रिटच्या टॅक्सी ट्रॅकमुळे प्रशिक्षण एअरक्राफ्ट धावपट्टीवरून एफटीओपर्यंत येणे सहजशक्य होणार होते. काही महिन्यांपूर्वी रेडबर्ड कंपनीने बेळगावमधील प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सध्या या ठिकाणी देशभरातील वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. आता बेंगळूर येथील समवर्धने कंपनीनेही एफटीओ बांधकाम पूर्ण केले असून येत्या काही दिवसात त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशातील एक वैमानिक प्रशिक्षण देणारे केंद्र म्हणून बेळगावची ओळख निर्माण होत आहे.









