रत्नागिरी – नागपूर महामार्गासाठी शासनाकडून मंजूरी : शासकीय जागेचा शोध सुरु
कोल्हापूर/आशिष आडिवरेकर
रत्नागिरी – नागपूर महामार्गाचे (एनएच 166) चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हा महामार्ग झाल्यानंतर वाढणारी वाहनांची संख्या, त्यांचा वेग होणारे संभाव्य अपघात लक्षात घेवून महामार्ग पोलीसांच्या नवीन चौकीस (मदत केंद्र) आंबा (ता. शाहूवाडी) येथे मंजूरी देण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरुपात ही पोलीस चौकी बोरपाडळे येथे सुरु करण्यात आली आहे.
रत्नागिरी – नागपूर (एनएच 166) हा नवीन राज्यमार्ग केंद्रसरकारच्या वतीने प्रस्तावित करण्यात आला आहे. पूर्वी कोल्हापूर शहरातून जाणारा हा महामार्ग आता केर्लीमार्गे (बायपास) वळविण्यात आला आहे. केर्ली- शिये चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर आहे. देशातील बहुतांशी राष्ट्रीय महामार्ग नागपूर जवळून जातात. विदर्भाचा कोकणाशी संपर्क नव्हता. कोकणात बंदरे असल्याने विदर्भ व मराठवाड्याला चांगला फायदा होवू शकतो. या मार्गामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ जोडले जाणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. या मार्गावर वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेवून शासनाने आंबा येथे महामार्ग पोलीस चौकी (मदत केंद्र) मंजूरी दिली आहे. याचे काम गेल्या आठवड्यापासून बोरपाडळे येथून सुरु झाले आहे. आवश्यक असणारे मनुष्यबळही देण्यात आले आहे. वाहनांची संख्या वाढल्यानंतर होणारे अपघात, अवजड वाहतूक, वाहनांचा वेग यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच आंबा येथे येथे मदत केंद्र झाल्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचणे शक्य होणार आहे.
तात्पुरत्या स्वरुपात बोरपाडळे येथे सुरु
राज्य महामार्गाची नवीन पोलीस चौकी आंबा येथे मंजूर करण्यात आले आहे. आंबा येथे 2 ते 3 एकर शासकीय जागेचा शोध सुरु आहे. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे ही पोलीस चौकी सुरु करण्यात आली आहे. आंबा येथे जागा मिळाल्यानंतर ही पोलीस चौकी तेथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे. कारवाई करण्यात आलेली वाहने, अपघात ग्रस्त वाहने, अॅम्ब्युलन्स, तसेच पोलीस वाहने उभारण्यासाठी महामार्ग पोलिसांना मोठ्या जागेची गरज असते. यामुळे आंबा येथे शासकीय जागेचा शोध सुरु आहे.
महामार्गावरुन होणारी वाहतूक
कोकणातून मासे, आंबा, काजू, चिरा, नारळ अशी वाहतूक कोल्हापूरला सुरु असते. हीच वाहतूक कोल्हापूरातून पुढे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात होते. याचसोबत कोल्हापूरातून साखर, भाजीपाला, कांदा, बटाटा अशा अनेक जीवनावश्यक वस्तूंसह, कोळसा, बॉक्साईट, पेट्रोल, डिझेल कोकणात जात असते. याचसोबत पर्यटकांची वाहतूकही या मार्गावर मोठ्या प्रमाणात होत असते. महामार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर कोकणची पश्चिम महाराष्ट्राशी कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. यामुळे या मार्गावर वाहतूकीचा लोड वाढण्याची शक्यता आहे. याचा विचार करुन राज्यशासनाने या मार्गावर पोलीस चौकी मंजूर केली आहे. महामार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 1 अॅम्ब्युलन्स, 1 क्रेन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आंबा पोलीस चौकीसाठी मंजूर अधिकारी, कर्मचारी
सहाय्यक पोलीस निरीक्षक : 1
पोलीस उपनिरीक्षक : 2
पोलीस अंमलदार : 33
अॅम्ब्युलन्स : 1
क्रेन : 1









