स्थिती बदलण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना एक लाख डॉलर्स शुल्क भरावे लागणार नाही
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-1बी व्हिसासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता सर्व अर्जदारांना 1,00,000 डॉलर्स शुल्क भरावे लागणार नाही. एच-1बी व्हिसाधारकांना त्यांची स्थिती बदलण्यासाठी किंवा त्यांचा मुक्काम वाढवण्यासाठी वाढीव शुल्क भरावे लागणार नसल्याने भारतीयांना दिलासा मिळाला आहे. एक लाख डॉलर्सचे शुल्क केवळ नवीन अर्जदारांसाठी लागू असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, त्यासाठीही काही अटी व नियम ठरविण्यात आलेले आहेत.
अमेरिकन नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 सप्टेंबर रोजी गैर-स्थलांतरित कामगारांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या आदेशाद्वारे दिलेली सूट स्पष्ट केली आहे. अमेरिकेत एच-1बी व्हिसा अर्जांवरील 1,00,000 डॉलर्स (88 लाख रुपये रुपये) हे शुल्क त्यांच्या स्थितीत बदल किंवा त्यांच्या वास्तव्याचा कालावधी वाढवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. साहजिकच सध्याच्या एच1-बी व्हिसा धारकांच्या अमेरिकेत येण्या-जाण्यावर कोणतेही बंधन नाही. अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीय तंत्रज्ञ व्यावसायिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जात आहे.
ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली तेव्हा आपला हा उपक्रम अमेरिकन लोकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र, यामुळे इतर परदेशी कामगार आणि कंपन्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. भारतीयांना विशेषत: याचा फटका बसणार होता. एच-1बी या व्हिसासाठी सर्वात जास्त अर्जदार भारतीयच आहेत. गेल्यावर्षी 2024 मध्ये मंजूर झालेल्या एच-1बी व्हिसा धारकांपैकी 70 टक्के भारतीय वंशाचे कर्मचारी होते. भारतात कुशल व्यावसायिकांची संख्या सर्वाधिक असून येथे सर्वाधिक अर्ज प्रलंबित आहेत.









