2025-26 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्केपर्यंत इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकार पुढील वर्षांसाठी या योजनेचे पुढील उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मोहिमेला लागणार आहे. या करिता सरकारने योजना तयार केली आहे. इथेनॉल मिश्रणाचे वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबरपर्यंत असते. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु, रस्ते परिवहन आणि महामार्ग, अवजड उद्योग मंत्रालय, खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग तसेच निती आयोग यांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापली गेली असून या समितीकडून येत्या मार्चपर्यंत या संदर्भातला अहवाल सादर केला जाणार असल्याचे समजते.
समितीच्या यापूर्वी पाच बैठका झाल्या असून या महिन्यात दोन ते तीन बैठका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील उद्दिष्ट साध्य करण्यासंदर्भातील योजनेबाबत चर्चा केल्यानंतर आपला अहवाल सरकारकडे समिती सादर करेल. पुढील पाच वर्षांपर्यंत पेट्रोलमध्ये 25 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. भारताचे अंतिम उद्दिष्ट 100 टक्के पूर्णपणे इथेनॉलचे राहिल. 100 टक्के इथेनॉलचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारच्या वतीने संबंधित अधिकारी ब्राझीलसोबत तांत्रिक सल्ला मसलत करत आहेत, असेही समजून आले आहे. 2025-26 मध्ये पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी अंदाजे 1016 कोटी लिटर इथेनॉलची गरज लागणार आहे. विकसित होणारी अर्थव्यवस्था, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, बदलती जीवनशैली या पार्श्वभूमीवर पाहता भारतामध्ये विजेची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी इथेनॉलची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मार्च 2024 पर्यंत रस्ते परिवहन क्षेत्रामध्ये उपयोगात येणाऱ्या इंधनापैकी 98 टक्के जीवाष्म इंधन होते तर उर्वरित 2 टक्के प्रमाण हे इथेनॉलचे होते. ऊर्जा सुरक्षा, पाणी, हवेचे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाची योजना सरकारने आणली आहे. यापूर्वी 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र या उद्दिष्टामध्ये नंतर बदल करण्यात आला आणि 2025 पर्यंतच हे उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरले. जानेवारीच्या अखेरपर्यंत एकूण मिश्रण क्षमता 17.4 टक्के इतकी होती. जी डिसेंबरच्या शेवटी 18.8 टक्के राहिली होती. परंतु सरकारचे अधिकारी आणि उद्योगामधील भागिदारांनुसार सध्याला सरासरी 16 टक्के मिश्रणाचा वापर इंधनामध्ये केला जातो, अशी माहिती मिळते आहे.
20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणखीन दीड वर्षे लागू शकतात, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत 18 टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट साध्य केले जाईल. 2026-27 च्या पुढील पाच वर्षांमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमाण 25 टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. याबाबतची योजना आखली जात आहे. 2023-24 मध्ये सार्वजनिक तेलमार्केटिंग कंपन्यानी पेट्रोलमध्ये 707 कोटी लिटरचे इथेनॉल मिसळले आहे. 2013-14 मध्ये हे प्रमाण पाहता केवळ 38 कोटी लिटर इतके होते. मागच्या वर्षी डिसेंबरपर्यंत पाहता इथेनॉल मिश्रण योजनेमुळे तेल मार्केटिंग कंपन्यांना जवळपास 1.13 लाख कोटी रुपयांची बचत करता आली आहे. इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलाची मागणी 1.98 कोटी टनाने कमी झाली आहे. या मोहीमेमध्ये देशातील दिग्गज ऑटो निर्मात्या कंपन्या टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझुकी, ह्युंडाई मोटर्स यांनी सहभाग घेतला आहे. 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यासाठी या कंपन्यांचे प्रयोग सध्या सुरू आहेत. देशातील 42 शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या भेडसावत आहे. कोट्यावधी रुपयांचे कच्चे इंधन देश मागवत असून यामुळे देशातील शहरे प्रदुषणाला सामोरी जात आहेत. इथेनॉल मिश्रणामुळे प्रदुषणाचे प्रमाण कमी होणार असून कच्च्या तेलाच्या विदेशातून होणाऱ्या आयातीवरचा भारही परिणामी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. जागतिक स्तरावर पाहता भारत हा तिसरा सर्वात मोठा तेल वापरणारा देश आहे. सरकारने नव्याने इथेनॉल उत्पादनाची क्षमता 1600 कोटी लिटरवर निश्चित केली आहे. 2024 मध्ये भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 15 टक्के इतके साधले होते. यामध्ये साखरेशी संबंधीत इथेनॉलची निर्मिती 400 कोटी लिटरची आहे. इतर इथेनॉलचे मिश्रण हे धान्यांच्या कोंड्यापासून म्हणजे 700 कोटी लिटरचे तयार केले जाते. 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण यशस्वीपणे पूर्ण होण्याची सध्याला आस वाढली आहे. ती पूर्ण झाली की मग 25 टक्क्याच्या नव्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्यासाठी भारताला आगेकुच करावी लागणार आहे.
दीपक कश्यप








