पंजाब राज्यात जालंधर-लुधियाना महामार्गावर ‘पंज आब’ नामक एक स्थान आहे. ते पाहण्यासाठी दूरवरून शेकडो पर्यटक येत असतात. या स्थानाचे वैशिष्टय़ असे आहे, की येथे आल्यानंतर पर्यटकांना दोनशे किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षांपूर्वीची जीवनशैली अनुभवायला मिळते. त्या काळात पंजाबी माणसे कशी रहात होती? काय खात होती? स्वयंपाक कसा करीत होती? पदार्थ कोणते होते? लोकांची वस्त्रs कशी होती? ती कशी तयार केली जात असत? विजेशिवाय जीवन त्याकाळी असे जगले जात असे? तसेच मोबाईल, संगणक, टीव्ही इत्यादी आधुनिक सोयींशिवाय माणसे कसे आयुष्य व्यतित करीत होती? याचा जिताजागता अनुभव हे स्थान पर्यटकांना देते. थोडक्मयात येथे घडय़ाळाचे काटे दोनशे वर्षांहून अधिक काळ मागे फिरविले जातात. त्यामुळे या स्थानाचे आकर्षण मोठे आहे.

येथील घरेही सिमेंट काँक्रिटची नसून मातीची आहेत. घरातील जमीन पूर्वीच्या काळासारखी आहे. येथे शेतीही आधुनिक पद्धतीने केली जात नाही. त्यामुळे त्याकाळी शेतकरी कसे काम करीत असे, याचाही अनुभव घेता येतो. येथे नळाचे पाणी नाही. मात्र, पूर्वीसारख्या विहिरी खोदल्या आहेत. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या जमान्यातील म्युझिक सिस्टीम येथे उपलब्ध आहे. अगदी जुन्या काळातील रेडिओ सेटही आपल्याला पहावयास मिळतात. दोन दशकांपूर्वी असे स्थान विकसित करण्याची कल्पना गुरुइक्बाल सिंग यांना सुचली. त्यांचे पिता अजमेर सिंग यांनी असा प्रयोग केला होता. त्या प्रयोगाचीच ही व्यापक आवृत्ती आहे. येथे आल्यानंतर पर्यटकांना एका वेगळय़ाच जगात आल्याचा अनुभव प्राप्त होतो. त्यामुळे येथे येण्यासाठी कित्येक महिने आधी आरक्षण करावे लागते. एकावेळी मर्यादित संख्येनेच लोकांना प्रवेश असतो. हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे अनेक पर्यटक नंतर सांगताना आढळतात.









