पुणे / प्रतिनिधी :
देशासमोर असलेल्या प्रश्नांबद्दल तरुणाईच्या मनात आस्था, संवेदना निर्माण करायची असेल, तर अभ्यासक्रमातून हिंसा आणि कटुतेऐवजी वेदना आणि दुःख पोहोचवले पाहिजे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.
‘सरहद संस्थे’च्या धनकवडी येथील ‘सरहद पब्लिक स्कूल’च्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. नूतन इमारतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, संत सिंग मोखा, शैलेश पगारिया, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, पत्रकार श्रीराम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशासमोर असणारे प्रश्न सोडवण्यासाठी येणारी नवी पिढी वैचारिकदृष्ट्या सशक्त असली पाहिजे. ती होण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण काय बिंबवतो आहोत, हेही पाहायला हवे. सध्याच्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमातील फाळणीचा इतिहास वाचला, तर त्यातून वेदनेऐवजी रक्तपात, हिंसा आणि कटुता रुजण्याची शक्यता अधिक आहे. तरुणाईच्या मनात ही भावना रुजणे, हे देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही, सीबीएससी बोर्डाने याचा विचार केला पाहिजे.
गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुधारणेचा कायम पुरस्कार केला. ऐक्याची भूमिकाही अधोरेखित केली. काश्मिर आणि उत्तरेतल्या काही राज्यांना सतत अस्थिरतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिथली तरुणाई अस्वस्थ असते. या अस्वस्थ तरुणाईच्या मनात ऐक्याची आणि देश तुमच्या पाठिशी आहे, ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे. गोखले यांना अभिप्रेत असलेले हेच काम सरहद संस्था करत आहे, असेही पवार म्हणाले.








