7 लाख रुपयांचा ऐवज जप्त, हिंडलगा कारागृहात रवानगी
प्रतिनिधी/ बेळगाव
महांतेशनगर, अमननगर परिसरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या एका जोडगोळीला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 7 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्या जोडगोळीने फेब्रुवारीमध्येही चोऱ्या केल्याचे उघडकीस आले आहे.
परवेज जमीर पारिश्वाडी (वय 25) रा. आदिलशहा गल्ली, न्यू गांधीनगर, फरहान रियाजअहमद दलायत (वय 22) रा. गुलाबशा गल्ली, न्यू गांधीनगर अशी त्यांची नावे आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्ा़dरीशैल हुळगेरी व पथकातील एम. जी. कुरेर, सी. जे. चिन्नाप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, बसवराज कल्लाप्पन्नवर, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, रफिक मुजावर, मल्लिकार्जुन गाडवी, महेश वडेयर आदींनी ही कारवाई केली आहे.
घटनास्थळावर उपलब्ध झालेल्या ठशांच्या नमुन्यावरून या जोडगोळीपर्यंत पोहोचणे पोलीस दलाला शक्य झाले आहे. फिंगरप्रिंट विभागचे पोलीस निरीक्षक बसवराज इडली, बाहुबली अलगाले, संतोष माणकापुरे, रुद्रय्या हिरेमठ, हरीश यड्रावी आदींचेही या कामगिरीसाठी योगदान लाभले आहे.
पोलिसांनी परवेज व फरहान यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 50 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, 80 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 60 हजार रुपये किमतीचा कॅमेरा व दोन 2 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या जोडगोळीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या, घरफोड्यांचा सपाटाच सुरू झाला असून यापैकी जुन्या दोन प्रकरणांचा तपास लागला आहे.









