39 जणांची टीम सज्ज : राहुल-सोनिया, प्रियांका यांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढीलवषी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपली नवी टीम जाहीर केली आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह एकूण 39 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मुकुल वासनिक यांचा काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर, रजनीताई पाटील, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांसारख्या महाराष्ट्रातील महिल्या नेत्यांनाही वेगवेगळ्या पदांवर सामावून घेण्यात आले आहे.
काँग्रेस वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र, या नव्या समितीत जुन्यापेक्षा फारसा बदल करण्यात आलेला दिसत नाही. आता पक्षाध्यक्षांनी नवी टीम जाहीर करत काँग्रेसवर नाराज असलेले आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासह जी-23 च्या अनेक नेत्यांनाही स्थान दिले आहे. वरिष्ठ नेत्यांपैकी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियांका गांधी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, अधीर रंजन चौधरी, दिग्विजय सिंग, चरणजीत सिंग चन्नी, आनंद शर्मा यांच्यासह एकूण 39 नेत्यांचा नव्या टीममध्ये समावेश आहे. याशिवाय 32 स्थायी निमंत्रित, 9 विशेष निमंत्रित, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवादल अध्यक्षांनाही स्थान देण्यात आले आहे.
काँग्रेसच्या कार्यकारिणीत सचिन पायलट, शशी थरूर, अशोक चव्हाण, दीपक बावरिया यांच्या रूपाने नवी नावे पुढे आली आहेत. गौरव गोगोई, नासिर हुसेन, दीपा दास मुन्शी यांचाही ‘सीडब्ल्यूसी’मध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष निमंत्रितांमध्ये पवन खेडा, सुप्रिया श्रीनाटे आणि अलका लांबा यांचा समावेश आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनंतर पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, ‘सीडब्ल्यूसी’ची नवीन यादी प्रसिद्ध केली. ‘सीडब्ल्यूसी’ ही काँग्रेसची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. ही पक्षाची कार्यकारिणी आहे. काँग्रेसमधील अनेक मोठे निर्णय या समितीकडून घेतले जातात. यादी जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक महिन्यांपासून बैठकांच्या फेऱ्या सुरू होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या.