भाविकांना घालता येणार नाही फाटक्या जीन्स अन् स्कर्ट
वृत्तसंस्था / पुरी
ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात आता भाविकांना एका विशेष डेसकोडचे पालन करावे लागणार आहे. मंदिरात आता शॉर्ट्स, फाटक्या जीन्स आणि स्कर्ट घालून जाता येणार नाही. जगन्नाथ मंदिर प्रशासनानुसार देशाच्या अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू आहे. 1 जानेवारीपासून नवा ड्रेसकोड लागू होणार आहे. भाविकांमध्ये ड्रेसकोडविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून एक मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रशासनानुसार पोलीस आणि स्वयंसेवक यासंबंधी भाविकांवर नजर ठेवणार आहेत.
ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात आता भाविकांना फाटक्या जीन्स, हाफ पँट परिधान करून प्रवेश करता येणार नाही. 12 व्या शतकातील या मंदिरात एक जानेवारीपासून नवा ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिर समुद्रकिनारा किंवा उद्यान नाही. मंदिरात देवतांचा वास असतो, हे काही मनोरंजन स्थळ नाही असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा कायम राखणे आमची जबाबदारी आहे. दुर्दैवाने काही लोक इतरांच्या धार्मिक भावनांची पर्वा न करता मंदिरात येतात. काही लोकांना मंदिरात फाटक्या जीन्स, अन् हाफ पँटमध्ये पाहिले गेले आहे. मंदिरात येण्यासाठी मान्यताप्राप्त पोशाखावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी दिली आहे. मंदिराच्या ‘सिंह द्वार’वर तैनात सुरक्षाकर्मचारी आणि मंदिरातील प्रतिहारी सेवकांना ड्रेसकोड लागू करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.









