बेळगाव : गेल्या दहा वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कसाई गल्ली आणि परिसरातील ड्रेनेजची समस्या अखेर मार्गी लागली आहे. मुख्यमंत्री विशेष निधीतून नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी आमदार राजू सेठ यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी आमदार राजू सेठ आणि प्रभाग क्र. 3 च्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री विशेष निधीतून 2 कोटींचा निधी मंजूर
कसाई गल्ली आणि परिसरात घालण्यात आलेली ड्रेनेज लाईन अत्यंत जुनी असल्याने वारंवार ड्रेनेज तुंबण्याची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे ड्रेनेज समस्या सोडविण्यासंदर्भात रहिवाशांतून गेल्या दहा वर्षांपासून मागणी केली जात होती. ही समस्या लक्षात घेत आमदार राजू सेठ यांनी पुढाकार घेऊन नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी मुख्यमंत्री विशेष निधीतून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. कसाई गल्ली, दुर्गा हॉटेल तसेच टेंगिनकेरा गल्ली कॉर्नरपर्यंत नवीन ड्रेनेज लाईन घातली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









