60 स्थानकांवर लक्ष ठेवणार : कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी केंद्राची योजना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रविवारी नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. तसेच या कामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. ही गर्दी महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी या स्थानकावर झालेली होती.
या नव्या योजनेच्या अंतर्गत देशभरातील 60 महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यात अनेक महानगरांमधील स्थानकांचा समवेश आहे. अचानक गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि त्वरित निर्णय घेण्यासाठी त्यांना सक्षम केले जाणार आहे.
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी
गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकांच्या हालचाली न्याहाळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचेही मोठ्या प्रमाणावर साहाय्य घेण्यात येईल. प्रवाशांना योग्य स्थानी जाणे सुलभ व्हावे, यासाठी दिशादर्शक बाण आणि विभाजक (अॅरोज अँड सेपरेटर्स) स्थापन केले जातील. प्रयागराजच्या रेल्वेस्थानकाशी जोडल्या गेलेल्या किमान 35 रेल्वेस्थानकांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती निर्णयकक्ष स्थापन करण्यात येणार आहे. फूट ब्रिजेसवर आणि त्यांच्या पायऱ्यांवर बसलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या यापूर्वीच 200 ने वाढविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दुसरी घटना
यावेळच्या महाकुंभ मेळ्याच्या संदर्भातील ही दुसरी चेंगराचेंगरीची घटना आहे. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमाच्या मुख्य घाटावर काही दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला होता. रविवारी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या फूटब्रिजवरील चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांनी प्राण गमावले. या चेंगराचेंगरीची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून सर्व शक्यता गृहित धरल्या गेल्या आहेत.
घटना कशी घडली?
दिल्ली रेल्वेस्थानकाच्या 16 क्रमांकाच्या फलाटावर जाण्यास प्रवाशांनी एकच गर्दी केल्याने ही चेंगराचेंगरी झाली, अशी शक्यता आहे. रेल्वेगाड्यांच्या आगमनाची घोषणा करताना काहीतरी चूक झाल्याने 16 क्रमांकावरच्या फलाटावर नेणाऱ्या फूटब्रिजवर प्रवाशांची अचानक गर्दी झाली. यावेळी जिन्यावरुन चढणारे आणि उतरणारे प्रवासी एकमेकांना भिडल्याने मोठी पळापळी झाली. या गोंधळात अनेक प्रवासी खाली पडल्याने त्यांच्या अंगावरुन लोक धावले. परिणामी, 18 लोकांना जीव गमवावा लागला, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
घातपाताचा संशय
चेंगराचेंगरी हेतुपुरस्सर घडवून आणण्यात आली असावी, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हा घातपात असण्याची शक्यता गृहित धरुन तपास केला जात आहे. प्रवाशांना मुद्दामहून चुकीची माहिती दिली गेली काय, तसेच अफवा पसरविण्यात आल्या काय, या प्रश्नांची उत्तरेही तपासातून मिळतील, अशी शक्यता आहे. घातपात असल्यास तो घडवून आणणाऱ्यांना सैल सोडले जाणार नाही, असा निर्धार प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. सध्यातरी कोणत्याही एका शक्यतेवर भर दिला जाणार नाही. सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली जात असून या तपासणीतून स्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तपास त्वरित संपवून रेल्वे प्रशासनाकडे अहवाल सादर केला जाईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.









