कोल्हापूर :
राज्य सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या नियुक्ती प्रक्रिया पाहणार आहे. समितीमध्ये संबंधित जिह्यांचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सदस्य असतील.
राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या या नियमावलीत पात्रता निकष, जबाबदाऱ्या आणि निवड प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार आहे. तसेच नियुक्त अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा प्रचार, आपत्ती व्यवस्थापन आणि कायदा–सुव्यवस्था राखण्यास मदत करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या नियुक्ती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी शासन निर्धारित अटी पूर्ण कराव्या लागणार आहे.
- विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी निकष
– वय 25 वर्षांपेक्षा कमी व 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
– दहावी (एस.एस.सी.) पास, दुर्गम भासाठी आठवी परीक्षा पास
– महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव
– संबंधित व्यक्तीला फौजदारी गुह्याखाली शिक्षा झालेली नसावी
– निवृत्त शासकीय अधिकारी हे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीस पात्र
- नियुक्तीचे प्रमाण
– प्रत्येक एक हजार मतदारसंघामध्ये 2 विशेष कार्यकारी अधिकारी
– जिल्ह्यात 33 टक्के महिलांना संधी







