बेळगावकरांतून समाधान : शहराच्या दक्षिण-उत्तर भागात ठेकेदाराकडून स्वच्छतेचे काम सुरू
बेळगाव : नव्या ठेकेदाराकडून शहर स्वच्छतेचे काम 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेकडून दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात आमदार, महापौर, उपमहापौर व नगरसेवकांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या स्वच्छतेच्या कामाला चालना देण्यात आली आहे. नव्या ठेकेदाराकडून गणपत गल्ली, कांदा मार्केट, रविवार पेठ आदी ठिकाणी रात्रीच्यावेळीदेखील स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची उचल केली जात आहे. त्यामुळे बेळगावकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे. बेंगळूर येथील गणेश शंकर या नव्या ठेकेदाराकडून 1 ऑगस्टपासून शहर स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे.
शहराच्या दक्षिण भागात सोमवारी तर उत्तर भागात मंगळवारी स्वच्छता कामाचा रितसर प्रारंभ झाला. गणेश शंकर कंपनीला 29 कोटी 36 लाख रुपयांना शहर स्वच्छता कामाचा ठेका देण्यात आला आहे. यामुळे नव्या ठेकेदाराकडून मनपा व बेळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यापूर्वीच्या ठेकेदारांकडून व्यवस्थितरित्या कचरा उचल होत नाही, अशा तक्रारी वाढल्या होत्या. यापूर्वी केवळ 47 प्रभागांमध्ये 9 ठेकेदारांकडून स्वच्छता करण्यासह कचऱ्याची उचल केली जात होती. तर उर्वरित प्रभागांमध्ये महापालिकेकडून स्वच्छतेचे काम राबविले जात होते. पण आता शहरातील सर्व 58 प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी एकाच ठेकेदारावर सोपविण्यात आली आहे.
कचरा वाहतुकीसाठी 23 नवीन वाहने खरेदी
नवीन ठेकेदाराकडून कचरा वाहतुकीसाठी 23 नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यापूर्वी महापालिकेच्या ताफ्यात असलेल्या अनेक कचरावाहू वाहनांची दयनीय अवस्था झाली होती. पत्रे सडल्यामुळे वाहनांतून कचरा रस्त्यावर पडत जात होता. अनेकवेळा वाहनेदेखील बंद पडत होती. इतकेच नव्हेतर नवीन ठेकेदाराच्या माध्यमातून 1 हजाराहून अधिक कंत्राटी सफाई कामगार शहर स्वच्छतेचे काम करणार आहेत. तसेच ऑनलाईन वेतन घेणारे व महापालिकेचे नियमित सफाई कामगारदेखील दिमतीला असणार आहेत. गेल्या पाच दिवसांपासून नव्या ठेकेदाराकडून शहर स्वच्छतेचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्ली, कांदा मार्केट, रविवार पेठ आदी ठिकाणी स्वच्छता करत कचऱ्याची उचल करण्यात आली.









