शैक्षणिक अभ्यासक्रम नव्याने उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता मिळते. यातून त्यांना पुढील शिक्षणाची संधी मिळते. प्रगतीच्या संदर्भात अधिकाधिक शिक्षण व शैक्षणिक पात्रता फार महत्त्वाची ठरते. मात्र याच शैक्षणिक पात्रतेच्या आधारे जेव्हा असे पात्रताधारक उमेदवार रोजगाराचा शोध घेतात अथवा नोकरी, रोजगारासाठी प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांना आपल्या शैक्षणिक पात्रतेला आवश्यक कौशल्याची एवढेच नव्हे तर संबंधित क्षेत्रातील विशेष व विकसित कौशल्याची गरज भासते व त्यावरूनच कौशल्य आणि कौशल्य विकासाचे महत्त्व प्रकर्षाने लक्षात येते.
उद्योग-व्यवसायाच्या बदलत्या पद्धती व गरजांनुरुप उमेदवार कर्मचाऱयांमधील कौशल्यांमध्ये बदल घडून आलेले दिसतात. यामध्ये प्रचलित कौशल्यांमध्ये वाढ वा विकास आणि नवे कौशल्य आत्मसात करणे याचा प्रामुख्याने समावेश असतो. या नव्या कौशल्यांची पूर्तता करून ते आत्मसात कसे करावे हे आव्हान कर्मचाऱयांपुढे असतेच. याच स्वरुपाच्या अपेक्षा कंपनी व्यवस्थापनाच्या असतात.
या पार्श्वभूमीवर नव कौशल्य म्हणजे काय? याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. थोडक्यात नव कौशल्य म्हणजे कर्मचाऱयांनी आपल्या कामकाजाला आवश्यक व पूरक कौशल्यांचा अभ्यास करून आपल्या कामकाजाला अधिक उत्पादक व प्रभावी करणे होय. यासाठी आवश्यक असे प्रयत्न वा पुढाकार कंपनी व्यवस्थापनाकडून केला जातो.
एक प्रस्थापित व्यवस्थापन वास्तव म्हणजे कर्मचारी नव्हे तर कौशल्यपूर्ण कर्मचारी ही कंपनीची नेहमीच जमेची बाजू असते. यासाठी व्यवस्थापन नेहमी प्रयत्नशील असते. याचे प्रत्यंतर उमेदवारांच्या मुलाखत, निवड प्रक्रियेपासून येते. जे उमेदवार कंपनीची प्रक्रिया, व्यवसायासाठी आवश्यक पात्रता व कौशल्य ज्या उमेदवारांकडे असतात अशांना निवड करताना प्राधान्य दिले जातेच, प्रसंगी अशा उमेदवारांना त्यांच्या कौशल्य, पात्रतेनुरुप वाढीव वेतन दिले जाते हे या संदर्भात लक्षणीय ठरते.दुसरीकडे उमेदवार, कर्मचाऱयांच्या दृष्टीने नव कौशल्य ही बाब फार महत्त्वाची ठरते. नव्या कौशल्यांमुळे उमेदवार म्हणून संबंधितांचा विश्वास वाढतोच, शिवाय नोकरीसाठी वा नोकरीतील बदलासाठी उमेदवार म्हणून विचार करताना त्यांना त्यांच्या वाढत्या कौशल्यांचा फायदा होतो. अशा उमेदवारांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. हीच बाब भविष्यकाळाच्या संदर्भात दिसून येते. जे कर्मचारी नोकरीवर रुजू झाल्यानंतर नवे कौशल्य शिकतात व त्यांचा अवलंब करतात त्यांना नव्या जबाबदारीसह पदोन्नती यासारखे फायदे निश्चितपणे होतात.
कौशल्य विकासाच्या संदर्भात दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणून मुलभूत वा आधीच्या कौशल्यांमध्ये आवश्यकतेनुरुप व योजनापूर्वक वाढ करणे. कौशल्यांमध्ये भर घातल्याने बदलत्या व स्पर्धेच्या काळात व्यक्तिगत स्तरावर कर्मचारी परिणामकारक व व्यक्तिगत स्तरावर अधिक प्रभावी व परिणामकारकपणे काम करू शकतात. सध्याच्या व्यावसायिकच नव्हे तर व्यक्तिगत स्तरावर वाढती स्पर्धा व मोठय़ा औद्योगीकरणाच्या पार्श्वभूमीवर वाढीव कौशल्याला पर्याय नाही.
आज कंपनी व्यवस्थापनाचा कस आणि भर कर्मचाऱयांना अधिकाधिक प्रगत व कौशल्यपूर्ण करण्यावर असतो. यासाठी व्यवस्थापनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. काही व्यवस्थापनांतर्फे वार्षिक स्वरुपात कर्मचाऱयांच्या कामगिरीच्या मोजमाप प्रक्रियेमध्ये संबंधित कर्मचाऱयाने त्या आर्थिक वर्षात आपले काम योग्यप्रकारे करतानाच कोणते नवे कौशल्य आत्मसात केले त्याची नोंद ठेवली जाते व दखलही घेतली जाते. यातून कर्मचाऱयांपासून कंपनी स्तरावर कर्मचाऱयांचा कौशल्य आलेख संदर्भासाठी उपलब्ध होतो. याचा परिणामकारक उपयोग निश्चितपणे होतो. कोरोनानंतरच्या काळात कौशल्य विकासाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. त्या सुमारे दोन वर्षांच्या कोरोना कालावधीने कंपनी आणि कर्मचाऱयांच्या काम आणि कामकाज यांचा चेहरामोहरा बदलला. कामबंदीसह आलेल्या त्या आव्हानपर संकटाने अनेकांपुढे व्यवसाय कामकाजापासून रोजगारापर्यंतचे संकट बहुविध स्वरुपात उभे ठाकले. तातडीने सर्वांनाच पर्यायी काम रोजी रोटीचा प्रश्न या स्वरुपात स्विकारावे लागले. त्यासाठी सर्वात मोठी गरज भासली ती कंपनीला नवा व्यवसाय शोधून तो पडताळण्याची व कर्मचाऱयांनी परंपरागत व चाकोरीबद्ध काम करण्याबद्दलच आग्रही न राहता लवचिक क्षमतेसह नवे व प्रसंगी सर्वस्वी नवीन कौशल्य शिकून, आत्मसात करून त्यांची तातडीने व अचूकपणे अवलंब करण्याची, कंपनी व कर्मचारी या उभयतांनी या आव्हानांकडे संधी म्हणून पाहिले व त्याचा मोठा फायदा सर्वांना झाला. कोरोनानंतरच्या काळात पण अनेक ठिकाणी याचाच प्रत्यय येत आहे.
आकडेवारी व तपशिलासह सांगायचे म्हणजे ‘टॅलेंट एलएमएस’ या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार कोरोना दरम्यान 42 टक्के कंपन्यांनी बदलत्या व्यावसायिक स्थिती व गरजा लक्षात घेता कर्मचाऱयांना तातडीने व प्रयत्नपूर्वक नवे कौशल्य उपलब्ध करून दिले तर सुमारे 64 टक्के कर्मचाऱयांनी नवे कौशल्य शिकण्याच्या या प्रयोग वा उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामागे अर्थातच कोरोनामुळे अचानक उदभवलेल्या आव्हानपर परिस्थितीवर मात करण्याची जिद्द होती. नंतरच्या काळात कौशल्य विकासाचे विविध उपयोग व फायदे कंपनी कर्मचाऱयांसह संपूर्ण उद्योग विश्वाच्या लक्षात आले आहेत. कोरोनादरम्यान व नंतरच्या काळात अर्थ उद्योगाला याचा फायदा झालाच शिवाय आता कर्मचारी आणि कौशल्य यांचा नव्याने व नव्या संदर्भासह विचार करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने सुरू झाली.
राष्ट्रीय स्तरावर 2014 मध्ये केंद्रिय कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करण्यात आले. त्यानंतर या उपक्रमाला केंद्र आणि राज्य स्तरावर चालना देण्यात आली. या प्रयत्नांचा मुख्य उद्देश देशांतर्गत व्यवसाय उद्योग क्षेत्राच्या कौशल्य विषयक गरजा व उपलब्ध कौशल्य यामधील तफावत जाणून त्यानुरुप कौशल्य विकास उपक्रमाला देश पातळीवर औद्योगिक क्षेत्र निहाय चालना देणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ उपक्रमाचा हा मोठा व महत्त्वाचा टप्पा असल्याने त्यासाठी सातत्याने प्रयत्न होत गेले.
दत्तात्रय आंबुलकर








