परिसरातील येथे 16 फूट पाणी तुंबल्याने घरे ढासळण्याची भीती : आमदार, महानगरपालिकेने कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : विनायकनगर, लक्ष्मीटेक येथील बुडा स्कीम नं. 51 मध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या व्यावसायिक आस्थापनासाठी 16 फूट खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी तुंबले असल्याने शेजारील घरांना याचा धोका निर्माण झाला आहे. काही घरांना तडे जात असून, भीतीच्या छायेखाली वावरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालून आमदार असिफ सेठ व महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
बुडा स्कीम नं. 51 येथे व्यावसायिक आस्थापन उभारण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. तळमजल्यासाठी 16 फूट खड्डा खोदण्यात आला असून, जमिनीवर तसेच चोहोबाजूंनी काँक्रीट घालण्यात आले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास वाट नसल्याने तब्बल 16 फूट पाणी खड्ड्यात तुंबले आहे. खड्ड्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले असून, नजीकच्या घरांना मात्र यामुळे धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी काही घरांचे बांधकाम देखील ढासळले आहे. यानंतर आता संरक्षण भिंतींना देखील तडे जात आहेत.
सांडपाणी-पावसाचे पाणी वाहून जाण्यास गटारी नसल्याने समस्या
बांधकाम करणाऱ्यांना येथील पाणी काढण्यासंदर्भात स्थानिकांनी सूचना केली होती. त्यावेळी पाणी काढले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झालेली नाही. येथील गटारींचे देखील बांधकामावेळी नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यास गटारी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
आमदार-मनपाने समस्या मार्गी लावावी
तुंबलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य व वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने लहानमोठे अपघातही घडत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे आमदार असिफ सेठ व महापालिकेने लक्ष घालून येथील समस्या मार्गी लावावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांतून केली जात आहे.









