वार्ताहर /किणये
तालुक्यात सोमवारी दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात झाली. या दौडच्या माध्यमातून गावांमध्ये एकीचे दर्शन घडले. दुर्गामाता दौडमुळे एक नवीन स्फूर्ती निर्माण झाली होती. अगदी गावागावांमध्ये भगवेमय वातावरणात ही दौड झाली झाली. विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे सजीव देखावे धारकऱ्यांनी व मुलींनी साकारले होते.
बस्तवाडमध्ये दौड जल्लोषात
बस्तवाड गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आलेली दुर्गामाता दौड सोमवारी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. गावातील गणेश मंदिर येथून दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. प्रारंभी गणेश मूर्तीचे पूजन यल्लाप्पा घंटांनी यांच्या हस्ते करण्यात आले. ही दौड छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ आल्यानंतर शिवरायांच्या मूर्तीचे पूजन संजू मरगाण्णाचे यांनी केले. शस्त्रपूजन मनोहर काकतकर यांच्या हस्ते करण्यात आले. संभाजी गल्ली, शिवाजी गल्ली, तानाजी गल्ली, नेताजी गल्ली, होळी गल्ली तहसीलदार गल्ली, साईनगर येथून होसगेरी गल्लीत ही दौड आली. बसवाड गावांमधील प्रत्येक गल्यांमध्ये दुर्गामाता दौड येणार असल्यामुळे घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्या दौडचे महिला आरती ओवाळून स्वागत करीत होत्या. ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांच्यावतीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. दौडमध्ये विविध देखावे साकारण्यात आले होते. तसेच गायीचे रक्षण करा असा संदेशही या दौडच्या माध्यमातून देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा भरकार्यांनी दिल्या यामुळे अवघा परिसर दणाणून गेला होता. दौडमध्ये कार्यकर्त्यांनी पांढरे कुरते परिधान केले होते. तर सर्वांच्या डोक्यावर भगवे फेटे होते यामुळे अवघा गाव भगवेमय बनला होता.
हलगा येथे आकर्षक देखावे सादर
हलगा गावात सोमवारी मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दौडला सुरुवात झाली. विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन व शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी धारकऱ्यांनी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हटले. महावीर गल्ली, पाटील गल्ली, मरगाई गल्ली, लक्ष्मी गल्ली, नवी गल्ली, तानाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर या ठिकाणी ही दौड झाली. या दौडमध्ये आकर्षक असे देखावे साजरे करून सामाजिक संदेश देण्यात आला.
मंडोळीत शिस्तबद्ध दौड
मंडोळी गावात सोमवारी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने दुर्गामाता दौड झाली. गावात सर्वत्र भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व गावातील सर्व देवतांचे पूजन यावेळी करण्यात आले. महिला आरती ओवाळून ठिकठिकाणी स्वागत करीत होत्या मंडोळीसह पंचक्रोशीतील धारकऱ्यांनी या दौडमध्ये सहभाग घेतला होता.









