लालूप्रसाद अन् तेजस्वी यादव यांचे नाव सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने पहिले पुरवणीआरोपपत्र दाखल केले आहे. यात आरोपी म्हणून माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचेही नाव सामील आहे. तेजस्वी यादव हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीकोनातून ईडी याप्रकरणी चौकशी करत आहे. यंत्रणेने 100 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून यात लालूप्रसाद आणि तेजस्वी यांच्यासोबत अन्य 8 जणांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्रासोबत 96 दस्तऐवज जोडण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील मनीष जैन आणि ईशान बैसला यांनी दिली.
आरोपपत्राच्या आधारावर आता दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद सुरू होतील, याकरता विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी 13 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी यंत्रणेने जानेवारी महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते. यात राबडी देवी, मीसा भारती, लालूप्रसादांच्या कन्या हेमा यादव आणि अमित कात्याल यांचे नाव सामील होते. तसेच रेल्वेचा माजी कर्मचारी हृदयानंद चौधरी देखील आरोपी आहेत. याप्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला होता, ज्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीकोनातून याप्रकरणी तपास हाती घेतला होता.
लालूप्रसाद यादव हे 2004 ते 2009 या कालावधीत रेल्वेमंत्री होते. या दरम्यान ड श्रेणीच्या नोकऱ्यांच्या बदल्यात लोकांकडून जमिनी मिळविण्यात आल्याचा आरोप आहे. यात प्रकरणी लालूप्रसाद यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयातील अनेक जण आरोपी आहेत. तर ज्या लोकांकडून नोकरीच्या बदल्या जमिनी घेण्यात आल्या, त्यातील बहुतांश जण गरीब कुटुंबाशी संबंधित आहेत.
ईडीसोबत सीबीआयने देखील लालूंच्या कुटुंबाला आरोपी केले आहे. परंतु सीबीआय प्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. ईडीने अमित कात्यालला 11 नोव्हेंबर 2023 रोजी अटक केली होती आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. कात्यालचा जामीन अर्ज सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
नोकरीच्या बदल्यात जमिनीचा घोटाळा एके इन्फोसिस्टीम्स आणि एबी एक्सपोर्ट्सच्या नावावर करण्यात आला होता. या कंपन्यांना लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आले होते. एके इन्फोसिस्टीम्सने 1.89 कोटी रुपयांमध्ये 11 भूखंड खरेदी केले होते. तर कंपनीकडून हे सर्व भूखंड केवळ 1 लाख रुपयांमध्ये लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आले होते.









