महानगरपालिका अर्थ-कर स्थायी समिती बैठकीत निर्णय : विविध विषयांवर चर्चा
बेळगाव : पोदार स्कूल, टिळकवाडी क्लब, ए व बी खाता नोंदणीसाठी घेतलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर्सचा पगार करणे, जाहिरात फलक कर आकारणीसाठी नवीन बायलॉजला सोमवार दि. 15 रोजी झालेल्या अर्थ व कर स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेखा हुगार होत्या. सोमवारी स्थायी समिती सभागृहात अर्थ व कर स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीलाच कौन्सिल सेक्रेटरींनी पोदार स्कूलचा विषय चर्चेला घेतला. सदर शाळेचा विषय मनपा आयुक्तांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. फेरमोजणी करण्यात आली असून त्यांना जादा चलन दिले पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
त्यामुळे मनपा आयुक्तांच्या न्यायालयात कोणता निर्णय होतोय ते पाहू, त्यानंतर सदर विषय पुन्हा स्थायी समितीसमोर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. टिळकवाडी क्लबसंदर्भात यापूर्वीच डिमांड नोटीस बजावण्यात आली होती. मात्र सदर दावा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. न्यायालयाने पुन्हा नवीन फेरमोजणी करण्याचा आदेश बजावला असून त्यानुसार नवीन डिमांड नोटीस दिली जाणार आहे. त्याचबरोबर मनपा आयुक्तांच्या न्यायालयातही हे प्रकरण सुरू असल्याचे सांगण्यात आले. जाहिरात फलकासाठी कर आकारण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने बजावला आहे.
त्यामुळे कर वसुली बंद करण्यात आली असल्याने मनपाचा कर बुडत आहे. या माध्यमातून वर्षाकाठी अडीच कोटी रुपयांचा कर महापालिकेला जमा होत होता. त्यामुळे जाहिरात फलकांसाठी कर आकारणी करण्यासाठी नवीन बायलॉज तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते व शहरांतर्गत रस्त्यांवर लावण्यात येणाऱ्या फलकांची ए, बी आणि सी कॅटेगरीत विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडून कर आकारण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे नवीन बायलॉजला मंजुरी देण्यात आली.
राज्य सरकारने ए व बी खाता नोंदणीसाठी तीन महिन्यांसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर्स घेण्याची सूचना केली होती. 25 ऑपरेटर्स तीन महिन्यांसाठी घेण्यात आले होते. पण ए व बी खाता नोंदणीसाठी आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आल्याने कॉम्प्युटर ऑपरेटर्सकडून अतिरिक्त तीन महिने काम करून घेण्यात आले. त्यामुळे त्यांचा थकीत पगार देण्यासाठी समितीने मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आल्यानंतर पगार देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली.









