गुहागर :
गुहागर आगाराच्या ताफ्यात मे महिन्यात ५ नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. लेलैंड कंपनीच्या या गाड्या आरामदायी व लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त आहेत. मात्र आगारातून या नवीन गाड्या फक्त घाटमाथ्यावर सोडण्यात येत असून मुंबई मार्गावर या गाड्या सोडण्यात येत नाहीत. यासाठी कमी ‘अॅव्हरेज’चे कारण सांगितले जात असले तरी यामुळे मुंबईकर चाकरमान्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या नवीन गाड्यांच्या माध्यमातून सध्या तवसाळ अक्कलकोट, गुहागर-अक्कलकोट, गुहागर-तुळजापूर या घाटमाथ्यावरील फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र मुंबई, विरारा, बोरीवली, ठाणे या मार्गावर या गाड्यांचा अद्याप प्रवास सुरू झालेला नाही. जिल्ह्यातील इतर आगारामध्येही हीच स्थिती असल्याने आगारातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
- देखभाल कर्मचारी नाही
तसेच गुहागरसाठी दाखल झालेल्या लेलैंड कंपनीच्या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंपनीने अजूनही त्यांच्या कंपनीचा कर्मचारी नियुक्त केलेला नाही. प्रत्येक आगारामध्ये अशीच स्थिती आहे. पाचपेक्षा जास्त गाड्या आगारात दाखल झाल्यावर त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंपनीचे कर्मचारी नियुक्त होणार आहेत. सध्या मात्र ज्यावेळी काम निघेल त्यावेळी कंपनीचा कर्मचारी गुहागरमध्ये येऊन आवश्यक दुरुस्ती करत आहे.
- मुंबई मार्गावरील गाड्या गळक्या
एकीकडे नवीन गाड्या घाटमाथ्यासाठी धावत असताना मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची अवस्था मात्र बिकट आहे. अनेकवेळा गळक्या गाड्या सोडण्यात येत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांमधून जाब विचारण्यात आल्यावर या गाड्या मुंबई आगाराच्या असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
- अपेक्षित ‘अॅव्हरेज’ नाही
घाटमाध्यावर सोडण्यात येत असलेल्या नव्या गाड्यांना इंधनाच्या एका लिटरमागे ४.५० कि.मी.चे अॅव्हरेज मिळत आहे. मात्र मुंबईच्या दिशेला तेच अॅव्हरेज ३.५० कि.मी.चे मिळत आहे. यामुळे कमी अॅव्हरेज असल्याने सध्यातरी घाटमाथ्यावरच या गाड्या धावत आहेत. जुलमध्ये आणखी ५ गाड्या आगारासाठी प्राप्त झाल्या तर त्या मुंबईच्या दिशेने सोडण्यात येतील अशी माहिती आगारातील एका अधिकाऱ्याने दिली. मात्र आगाराच्या या धोरणामुळे मुंबईकर चाकरमनी प्रचंड नाराज असून मुंबई मार्गावर नव्या गाड्या पाठवाव्यात, अशी मागणी करत आहे.








