बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात येत्या जून महिन्यात नवीन वातानुकुलित स्लीपर बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे परिवहनच्या बससेवेवरील ताण काही अंशी कमी होणार आहे. मागील वर्षभरात 25 हून अधिक नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. पुन्हा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन बसेस दाखल होणार आहेत. परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा असल्याने सर्वसामान्य वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. त्यातच शक्ती योजनेमुळे परिवहनच्या बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे काही मार्गांवर बसफेऱ्या कमी पडू लागल्या आहेत. दरम्यान, सरकारकडे नवीन बसेससाठी मागणी करण्यात आली होती. शासनाने नवीन बस उपलब्ध करून देण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच ताफ्यात नवीन बस दाखल होणार आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज 650 हून अधिक बसेस विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही मार्गावर चेंगराचेंगरी करत प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. तर बसेसचा तुटवडा असल्याने काही भागात बसफेऱ्या सोडणे अशक्य होऊ लागले आहे. बसचा तुटवडा असल्याने सर्वसामान्य प्रवासी, शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदार प्रवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी परिवहनच्या ताफ्यात अतिरिक्त बसेसची गरज होती. त्यानुसार येत्या जूनमध्ये नवीन बसेस दाखल होतील, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. यात्रा-जत्रा, लग्नसराई व इतर कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. शक्ती योजनेमुळे महिलांकडून परिवहनच्या बसलाच अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बसेस फुल्ल होऊन धावू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आता परिवहनच्या ताफ्यात अतिरिक्त बसेसची गरज तीव्रतेने जाणवू लागली आहे.









