जुन्या बंधाऱ्यानजीक नवा बंधारा उभारणार : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
वार्ताहर/कुडची
कृष्णा नदीवर कुडची-उगार दरम्यान बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम येत्या वर्षात पूर्ण करून लोकार्पण करण्यात येईल. याशिवाय जुन्या पूलवजा बंधाऱ्याजवळ पुन्हा एक बंधारा उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. कुडची येथे कृष्णा नदीच्या वाढत्या पाण्याची व पूरस्थितीच्या तयारीची पाहणी करून सोमवारी ते बोलत होते. पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले, कुडची येथे सध्या असलेला बंधारा उपयुक्त असला तरी तो जीर्ण झाला आहे. याशिवाय या बंधाऱ्यावर पाणी आल्यावर वाहतूक बंद होते. त्यामुळे या भागातील लोकांना दुसरा पर्यायी मार्ग खूप दूरवरचा आहे. त्यामुळे येथे नवीन पूल बांधण्यात येत असून त्याचे काम लवकर पूर्ण करून पुढील पावसाळ्यापर्यंत त्याचे लोकार्पण होईल.
जुन्या बंधाऱ्याजवळ दुरुस्ती करून येथे पुन्हा बंधारा निर्माण करण्यात येईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. यामुळे पाण्यासाठी उपयुक्त बंधाराही कायम राहणार आहे. या भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री जारकीहोळी यांनी येथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, अर्जुन नाईकवाडी, नगराध्यक्ष हमीदोद्दीन रोहिले, तहसीलदार सुरेश मुंजे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते वड्डर, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी सुरेश कद्दू, डी. एस. नाईक, साहेबलाल रोहिले, मुश्फिक जिनाबडे, सादिक सज्जन, रेवणा सराव, सादिक रोहिले, हणमंत सनदी आदी उपस्थित होते. कुडची येथील पाहणीदौरा झाल्यानंतर मंत्री जारकीहोळी यांनी रायबाग येथे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तालुकास्तरीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.









