मंत्री के. एच. मुनियप्पा :अपात्र बीपीएल कार्डाचे एपीएलमध्ये रुपांतर
प्रतिनिधी/ बेंगळूर
अपात्र बीपीएल रेशनकार्डांचे पडताळणीनंतर पुढील महिन्यापासून नव्या बीपीएल कार्डांचे वितरण करण्यासाठी ऑनलाईनवर अर्ज करण्यास संधी दिली जाईल. एखाद्या वेळेस पात्र कुटुंबांचे कार्ड एपीएलमध्ये रुपांतर झाल्यास तत्काळ अर्ज करावा. त्यानंतर 24 तासांच्या आत सरकार दुरुस्ती करेल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली.
संपूर्ण दक्षिण भारतात कर्नाटकात सर्वाधिक बीपीएल कार्डे आहेत. राज्यातील 75 टक्के लोक बीपीएल यादीत आहेत. त्यामुळे अपात्र बीपीएल कार्डे रद्द करून त्यांचे एपीएल कार्डात रुपांतर केले जाईल. कोणतीही कार्डे रद्द केली जाणार नाहीत. आम्ही बीपीएल कार्डासाठी अपात्र असणाऱ्या कुटुंबांना एपीएल यादील समाविष्ट करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने बीपीएल कार्डांच्या पडताळणीसाठी राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्यात सुमारे 7 लाख अपात्र बीपीएल कार्डे काढून टाकण्याचे निर्देश आहेत. याबाबत राज्य सरकार अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करणार आहे. पुढील महिन्यात नवी बीपीएल कार्डे वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. पात्र असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला बीपीएल कार्ड देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रेशन वितरण व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंबे बीपीएल सुविधांसाठी पात्र आहेत. त्यामुळे अपात्र असणाऱ्यांना एपीएलमध्ये समाविष्ट केले जात आहे. केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार 7 लाख अपात्र बीपीएल कार्डे काढून टाकण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे दारिद्र्या रेषेवरील कुटुंबांचा शोध घेतला जात आहे, असे ते म्हणाले.









