खलिस्तानच्या थंड झालेल्या ताबूताभोवती ढोल बजावण्याचा प्रयत्न करणारा ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पंजाब पोलीस विशेष विमानाने त्याला आसाममधील दिब्रुगडला पोहोचवून आले आहेत. आपला लढा खूप व्यापक आहे असे भासवण्यासाठी अमृतपाल गेली 36 दिवस बेपत्ता होता. एका पोलिस ठाण्यात दहशत माजवून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आपण पुन्हा एकदा पंजाब अशांत करून दाखवू हा त्याचा मनसुबा अखेर उधळला गेला आहे. त्याला अटक करण्यात आली नसून तो स्वत: हजर झाला आहे असे त्याचे समर्थक भासवून त्याची नसलेली उंची वाढवायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्याने समर्पण केले आहे, आता बेकायदा पकडून ठेवलेल्या लोकांना मुक्त केले जावे अशी शहाजोगी वक्तव्ये त्याच्या कुटुंब आणि समर्थकांकडून आलेली आहेत. आपल्या कृतीभोवती वलय निर्माण करण्यासाठी त्याने मोगा जिह्यातील रोडे गाव गाठले. हे गाव 1980 च्या दशकात खूप चर्चेत होते. हे गाव त्यावेळचा खलिस्तानी कट्टरवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे गाव आहे. त्याचाही मोठा दबदबा त्याकाळात निर्माण झाला होता आणि आपणच मोठा केलेला हा भस्मासूर नष्ट करण्यासाठी इंदिरा गांधी यांना ऊद्रावतार धारण करण्याची वेळ आली होती. त्यासाठी अखेर सैन्याच्या मदतीने राबवावे लागलेले ऑपरेशन ब्लू स्टार हे प्रकरणच इंदिराजींच्या मृत्यूचे कारण ठरले होते. किंवा आजपर्यंत तरी त्यांच्या हत्येचे हेच एक कारण जगासमोर आलेले आहे, असे म्हणता येईल. तर अशा या काळ गाजवलेल्या भिंद्रनवाले याच्या गावातच अमृतपालला वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख बनवले होते. त्याचा पूर्वाश्र्रमीचा इतिहास वेगळा आणि उडाणटप्पूला शोभेल असाच आहे. त्याची तेव्हाची आणि आताची बदललेली राहणी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एखाद्या शीख प्रचारकासारखा पोशाख करून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करणारा हा युवक अचानकच कुठून उपटला? याची माहिती आता पंजाब आणि भारत सरकारने जाहीर केली पाहिजे. पाकिस्तानी संघटना आयएसआयचा यामध्ये काही हात आहे का? आणि त्यामुळेच तो पोलिसांच्या कचाट्यातून पळून जाऊन 36 दिवस गुंगारा देत होता का? याची माहितीही उघड केली पाहिजे. परदेशातल्या दूतावासांसमोर खलिस्तान निर्मितीसाठी नारेबाजी करायची आणि भारतात काहीतरी पेटलेले आहे असे जगात भासवायचे हा पाकिस्तानी कारभाराचा नमुना आहे. भारतात खरंच काहीतरी पेटलं आहे असे भासवून भिंद्रनवाले याच्या गावात हे रोपटे ऊजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच त्याने त्या गावातील मंदिरात प्रार्थना केली आणि नंतर समर्पण केले असे सांगितले जात आहे. परदेशात खलिस्तान संबंधी अध्ये मध्ये जे मोर्चे निघतात त्यातील सामील असणाऱ्या बहुतांश युवकांना भारत कुठे आहे, पंजाब कुठे आहे आणि त्यात आपल्या पूर्वजांचा गाव कुठे आहे याचीही कल्पना नसते. तीन पिढ्यांच्या आधी ज्यांच्या पूर्वजांनी हा देश सोडला आहे, त्यांच्या आजच्या पिढीला पंजाब कुठे आहे आणि खलिस्तान म्हणजे नेमके काय आहे हे माहीत सुद्धा नाही. मात्र तरीही कोणीतरी दूतावासासमोर घोषणा देतो म्हणून आपल्या धर्माचे काम म्हणून पाठिंब्यासाठी जाणारी एक पिढी आहे. आणि खरोखरच हा विषय लावून धरणारे आता इतिहासजमा होऊ लागले आहेत. त्यातील ही बहुतांश लोकांना त्या मागणीची निरर्थकता समजून आली आहे. त्यामुळे खलिस्तानचे समर्थन जवळपास जगात शहाण्या वर्गाकडून व्हायचे थांबले आहे. जो काही आवाज अधून मधून उठला जातो तो अशाच काहीही माहिती नसणाऱ्या नव्या पिढीचा असतो. जगातील अनेक देशातील भारतीय दूतावासांनी हा विषय अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्यास सुऊवात केली आहे. काही देशातील राजदूत तर प्रत्येक वषी ठराविक तारखेला येऊन निदर्शने करणाऱ्या लोकांशी शांतपणाने चर्चा करतात. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात त्यांच्या कार्यालयासमोरील घोषणाबाजी थांबल्याचेही आढळून आले आहे. एकूण खलिस्तान हा विषय पंजाबात आणि परदेशात फारसा चर्चेचा आणि आग्रहाचा विषय राहिलेला नाही. ज्यांना आजही खलिस्तान निर्मिती व्हावी असे वाटते त्यांच्यासाठी भारत सरकारने चर्चेचे दरवाजे कधीही बंद करू नयेत. मात्र खलिस्तानच्या नावाखाली 80 च्या दशकात जसा उच्छाद मांडला गेला तसा आता मांडला जाणार असेल तर तो निर्दयपणे चिरडून टाकला पाहिजे. कारण, प्रŽ देशाच्या एकता आणि अखंडतेचा आहे. भारतात पुन्हा फुटिरवादी शक्ती उदयास येणार नाहीत याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. अन्यथा भारताच्या शत्रूंना बळ मिळण्याची शक्यता आहे. या निरर्थक विषयावर आपण भांडत राहिलो आणि माणसांना गमावत राहिलो हे गेल्या शतकातील एका पिढीला लक्षात आलेले आहे. त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून पंजाबातच आपली प्रगती साधण्यास सुऊवात केली आहे. अकाली दलाच्या बरोबर सत्तेत आलेले लोक आता राजकारणात ऊळले आहेत. अकाली दलाच्या हातून आणि आता काँग्रेसची सत्ताही गेल्यानंतर नवख्या आम आदमी पक्षाकडे राज्याची सूत्रे आहेत. अशावेळी अनुभवी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी, लष्करी गुप्तहेर यांची जबाबदारी वाढलेली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाला एका राज्याचा प्रŽ म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी साहाय्याची भूमिका घेतली पाहिजे. नवा भिंद्रनवाले तयार होऊ नये आणि पुन्हा एकदा पंजाब अशांत होऊ नये म्हणून या कृती मागील कारस्थान ओळखून आताच तिथल्या कारवाया थांबवल्या पाहिजेत. पुन्हा जर इथे राजकीय खेळ झाला तर तो देशाला महागात पडेल. एका नसलेल्या मुद्याला पुन्हा हवा दिली जाईल. त्यामुळे हे रोखलेच पाहिजे.
Previous Articleनितीश-तेजस्वींनी घेतली ममता बॅनर्जींची भेट
Next Article कुस्तीपटू सर्वोच्च न्यायालयात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








