वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालय 12 डिसेंबर रोजी प्रार्थनास्थळ कायदा (1991) च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 5 डिसेंबरला होणार होती. त्यादिवशी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती मात्र सुनावणीपूर्वीच खंडपीठ उठले. आता 12 डिसेंबर रोजी सीजेआय संजीव खन्ना, न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या विशेष खंडपीठासमोर दुपारी 3.30 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, कथाकार देवकीनंदन ठाकूर, भाजप नेते आणि अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांच्यासह इतर अनेकांचा समावेश आहे.
प्रार्थनास्थळे (विशेष तरतुदी) अधिनियम, 1991 शी संबंधित कायद्यातील काही कलमांच्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर आता नवे खंडपीठ सुनावणी करेल. पूजास्थानसंबंधी कायद्याला अनेक याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले आहे. यामध्ये काशी राजघराण्याची कन्या महाराजा कुमारी कृष्ण प्रिया, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, माजी खासदार चिंतामणी मालवीय, निवृत्त लष्करी अधिकारी अनिल कबोत्रा, अधिवक्ता चंद्रशेखर आणि रुद्र विक्रम सिंह, वाराणसीचे रहिवासी स्वामी जितेंद्रनंद सरस्वती, मथुरा निवासी धर्मगुरू देवकीनंदन, अधिवक्ता अश्विनी उपाध्याय यांचा समावेश आहे. जमियत उलेमा-ए-हिंदनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हिंदू याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देण्यात आले आहे.









