आठवडा शिल्लक असल्याने धावपळ, विद्यार्थी 31 पासून शाळेत दाखल
बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवार दि. 29 मे पासून प्रारंभ होणार आहे. विद्यार्थी 31 मे पासून शाळांमध्ये येणार असले तरी त्यापूर्वी दोन दिवस शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहणार असून, अभ्यासक्रमाची तयारी करणार आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. शाळा सुरू होण्यास अवघा आठवडा शिल्लक असल्याने शाळांमध्ये नवीन प्रवेश करून घेण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 8 एप्रिल रोजी मागील शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर शाळांना उन्हाळी सुटी देण्यात आली होती. दीड ते पावणेदोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर आता पुन्हा एकदा शाळांचा परिसर गजबजणार आहे.
19 सप्टेंबरपर्यंत पहिले सत्र
29 मे ते 19 सप्टेंबरपर्यंत पहिले सत्र असणार आहे. त्यानंतर 8 ऑक्टोबर ते 10 एप्रिलपर्यंत दुसरे सत्र घेण्यात येणार आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबरपासून दसऱ्याची सुटी देण्यात येत असे. यावर्षी मात्र 20 सप्टेंबरपासून दसऱ्याच्या सुटीला प्रारंभ होणार आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुटी देण्यात आली आहे.
पुढील शैक्षणिक वर्षात 242 दिवस शाळांचे कामकाज
29 मे रोजी सर्व सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांवर शिक्षकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 31 मे पासून विद्यार्थी शाळांमध्ये दाखल होतील. मागील वर्षाचा अभ्यासक्रम, पुढील वर्षाचा अभ्यासक्रम यांना जोडण्यासाठी ब्रिज कोर्स देखील घेतला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात 242 दिवस शाळांचे कामकाज चालणार आहे. तर 123 दिवस सुट्या मिळणार आहेत.









