वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन प्रेक्षकांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी आणि सामने कमी कालावधीचे बनवण्यासाठी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन यावर्षी एप्रिलपासून निवडक स्पर्धांमध्ये किमान सहा महिन्यांसाठी नवीन 3×15 ‘स्कोअरिंग सिस्टीम’ची चाचणी घेण्यास सज्ज झाला आहे.
विद्यमान पद्धतीत एका सामन्यात 21 गुणांचे तीन गेम (3×21) खेळविले जातात. महासंघाच्या मंडळाने नोव्हेंबरमध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या बैठकीत सध्याच्या ‘स्कोअरिंग सिस्टीम’ची जागा ‘3×15’ पद्धतीने घेण्याचा पुरस्कार केला होता. या मंडळाने एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबर, 2025 दरम्यान निवडक खंडिय स्पर्धा, ग्रेड 3 स्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लीग व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘3×15’ पद्धतीची चाचणी घेण्याची योजना मंजूर केली आहे, असे महासंघाने म्हटले आहे.
इंटरनॅशनल चॅलेंज, इंटरनॅशनल सिरीज या ग्रेड-3 स्पर्धांमध्ये येतात. नवीन ‘स्कोअरिंग सिस्टीम’ निवडण्यामागील कारणे स्पष्ट करताना बॅडमिंटन महासंघाने म्हटले आहे की, सध्याच्या पद्धतीच्या तुलनेत 3×15 पद्धतीत प्रत्येक गेममध्ये कमी गुण असतील, ज्यामुळे प्रत्येक गुण अधिक रोमांचक होण्याची शक्यता वाढते. सध्याच्या पद्धतीच्या तुलनेत 3×15 गेममध्ये अंतिम गुणापर्यंत जलदरीत्या खेळाडू पोहोचेल आणि प्रत्येक गेम तसेच एकूणच सामना रोमांचक ठरण्याच्या बाबतीत नवी व्यवस्था सर्वोत्तम संतुलन साधेल, असेही महासंघाने म्हटले आहे.
3×15 पद्धतीमुळे सामन्यांचा कालावधी कमी होईल, वेळापत्रक चांगल्या पद्धतीने आखण्यास मदत होईल, चाहत्यांची रूची राखली जाईल आणि खेळाडूंना आरोग्याच्या दृष्टीने तसेच अधिक काळ खेळण्याच्या दृष्टीने लाभ होईल, असे महासंघाने म्हटले आहे.









