प्रतिनिधी / मडगाव
एखादा रूग्ण अंथरूणाला खिळून असतो, तेव्हा त्यांचे कुटुंबिय प्रचंड दडपणाखाली असतात. अंथरूणाला खिळलेला रूग्ण पुन्हा उठून उभा रहावा अशी सर्वांचीच इच्छा असते. अशावेळी डॉक्टरी उपचारच ही किमया साध्य करू शकते. अंथरूणाला खिळलेला रूग्ण पुन्हा उठून उभा राहिला म्हणजे कुटूंबाला होणारा आनंद खर तर शब्दात व्यक्त करणे कठीण असे. त्याच बरोबर डॉक्टरही आनंदीत होतात. डॉ. सतेंद्र देसाई यांनी अशीच एक किमया साध्य केलीय.
न्यूरोलॉजिकल आणि स्पाइनल सर्जन डॉ. सतेंद्र देसाई यांनी अर्धांगवायू मुळे गेली सुमारे दोन वर्षे अंथरूणाला खिळून असलेल्या एका रूग्णाला ‘टीडीसीएस’च्या न्यूरोमोड्युलेशन थेरपीचा वापर करून पुन्हा उभे करण्यात यश मिळविले. हा रूग्ण अंथरूणाला खिळून असल्याने, हा रूग्ण पुन्हा उठून उभा राहणार याची आशाच घरच्या मंडळींनी सोडून दिली होती. पण, ‘टीडीसीएस’च्या न्यूरोमोड्युलेशन थेरपीद्वारे हा रूग्ण पुन्हा उठून उभा राहिलाच, त्याच बरोबर उपचार करणारे डॉ. सतेंद्र देसाई यांना डॉक्टर… डॉक्टर अशी हाक मारली. आपल्यासाठी हा सुखद अनुभव होता असे डॉ. देसाई म्हणाले.
मुळ गोमंतकीय असलेल्या डॉ. सतेंद्र देसाई यांनी बोत्सवाना, जर्मनी आणि अमेरिका येथे आपली वैद्यकीय सेवा देतानाच त्याच ठिकाणी ‘टीडीसीएस’च्या न्यूरोमोड्युलेशन थेरपाचा अनुभव घेतला. जर्मनी आणि अमेरिकेत या थेरपीचा वापर केला जात असल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली. गोव्यात न्यूरोलॉजिकल आणि मानसिक परिस्थितीने ग्रस्त असलेल्या गरजू ऊग्णांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असल्याचे डॉ. देसाई सांगतात.
अमेरिका आणि युरोपमध्ये टीडीसीएसच्या न्यूरोमोड्युलेशन थेरपीद्वारे आणि आरटीएमएसद्वारे रूग्णांवर उपचार केले जातात. अशा प्रकारच्या उपचार पद्धतीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे ही उपचार पद्धत प्रचंड यशस्वी ठरलीय. हीच उपचार पद्धत आत्ता गोव्यात सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
न्यूरोमोड्युलेशन हे एक तंत्रज्ञान आहे जे सक्रियकरण किंवा दुऊस्तीची आवश्यकता असलेल्या नसांवर थेट कार्य करते. ट्रान्सक्रॅनियल डायरेक्ट करंट स्टिम्युलेशन (टीडीसीएस) आणि ‘आरटीएमएस’ किंवा रिपीटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ही या थेरपी अंतर्गत दोन तंत्रे आहेत. ज्याचा ऊग्णांना फायदा होईल असे मत डॉ. देसाई यांनी व्यक्त केले.
डॉ. सतेंद्र देसाई यांनी मडगाव येथे न्यूरोमोड्युलेशन अॅण्ड रिसर्च सेंटर सुरू केलेय. आपण जे रूग्ण घेतो ते सहसा सहा ते आठ महिन्यांहून अधिक काळ आणि दोन किंवा तीन वर्षांपर्यंत त्रास सहन करत असलेले असतात. ज्या लोकांचे न्यूरॉन्स काम करत नाहीत आणि बरे होत नाहीत जसे की अल्झेहमर रोग, तीव्र न्यूरोपॅथिक वेदना, मज्जातंतूचे आजार, पार्किन्सोनिझम, फायब्रोमायल्जिया, क्रॉनिक मायग्रेन, स्ट्रोक नंतर पुर्नप्राप्ती अशा प्रकरणांमध्ये टीडीसीएस आणि आरटीएमएस याचा फायदा होऊ शकतो, असे डॉ. देसाई म्हणाले.
टीडीसीएस असे उपकरण वापरते जे मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी बॅटरीमधून टाळूवर लहान डायरेक्ट करंट पाठवते. मेंदूच्या सीटी स्कॅनवर आणि न्यूरॉन्सची ठिकाणे ओळखण्यासाठी इतर चाचण्यांच्या आधारे डोक्मयाच्या काही भागांवर इलेक्ट्रोड्स बसवले जातात आणि इलेक्ट्रोड्सच्या दरम्यान वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. सामान्यत: थोडीशी खाज सुटणे किंवा मुंग्या येणे ही संवेदना पहिल्या काही सेकंदात टाळूवर जाणवते. टीडीसीएस चा उपयोग नैराश्य, चिंताग्रस्त विकार, तीव्र डोकेदुखी, टिनिटस, मल्टिपल स्क्लेरोसिस, संज्ञानात्मक कौशल्ये जसे की लक्ष आणि स्मरणशक्ती वाढवणे आणि भाषा आणि गणिती क्षमता वाढवण्यासाठी देखील केला जातो.
‘टीडीसीएस’ हे न्यूरॉन उत्तेजनामध्ये सुरक्षितपणे उलट करता येण्याजोग्या बदलांना प्रेरित करते आणि विविध परिस्थितींमध्ये फायदे आणू शकते. प्रत्येक सत्रासह, चेतापेशी सक्रिय होऊ लागतात आणि हळूहळू त्या नैसर्गिकरित्या मजबूत होतात आणि ऊग्णांमध्ये सुधारणा दिसून येते. ऊग्णाला सुमारे 10 ते 20 सत्रे करावी लागतात परंतु अनेकांना पहिल्या दोन ते तीन सत्रांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात.’ सुमारे एक महिन्यापूर्वी हे तंत्र सुरू केल्यापासून, आपल्याकडे काणकोण, सांगे, केपे, कळंगुट आणि मडगावसह राज्यभरातील सुमारे 35 ते 40 ऊग्ण आहेत, त्यापैकी काहींनी आधीच त्यांच्या सामान्य जीवनात परतण्यास सुऊवात केली आहे.









