रस्त्यांच्या दुतर्फा विक्रेते : कर भरण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष : बहुतांश विक्रेते परवानाविना
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून शहराचा विकास साधला आहे. विकास साधलेल्या गटारी, फुटपाथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. मनपाच्या 58 प्रभागांमध्ये ही परिस्थिती आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या विकासावर फेरीवाल्यांचे जाळे दिसू लागले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह रस्त्याच्या दुतर्फा गटारी, सायकल मार्ग, फूटपाथवर फळे, भाजीपाला, कपडे, चहा आणि इतर विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. शहरात अंदाजे 5 हजार 697 फेरीवाले आहेत. यापैकी बहुतांश फेरीवाले रस्ते आणि फूटपाथवरच विक्री करतात. त्यामुळे स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि इतर व्यापाऱ्यांना अडचणी वाढल्या आहेत.
या विक्रेत्यांकडून दैनंदिन 50 ते 100 रुपये कर मनपाला व्यवस्थित मिळत नाही. त्यामुळे मनपासमोर अडचणी वाढल्या आहेत. महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करून यांची विक्री सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत विक्री सुरू असते. साधारण प्रत्येक विक्रेता दैनंदिन 5 ते 6 हजारांचा व्यापार करतो. मात्र, महापालिकेचा कर चुकवत असतो. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर याचा परिणाम होऊ लागला आहे. शिवाय अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांपेक्षा अनधिकृत विक्रेत्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. अशा विक्रेत्यांची चौकशी करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.
बहुतांशी विक्रेत्यांनी रस्त्यावरच तंबू ठोकून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. 2018 च्या सर्वेक्षणानुसार शहरात 2500 विक्रेते होते. मात्र, त्यांची संख्या आता दुप्पटहून अधिक झाली आहे. ओळखपत्र आणि परवाना नसलेल्या विक्रेत्यांना ओळखपत्र आणि परवाना देणे मनपाचे काम आहे. शिवाय अशा विक्रेत्यांना अल्प कर्ज सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी मनपाने पुढे येणे गरजेचे आहे.
पीएम स्वनिधी योजनेतून किरकोळ विक्रेत्यांना अल्प कर्जाची सुविधा मिळवून दिली जाते. शिवाय रस्त्यांवरील विक्रेत्यांची ओळख निर्माण व्हावी यासाठी विक्री परवाना दिला जातो. मात्र, बहुतांशी विक्रेत्यांकडे ओळखपत्र आणि परवाना नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. उपजीविकेसाठी अनेक वर्षे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी मनपा आता कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे.









