स्वत:च्या सैन्याचा रसदपुरवठा करतोय मजबूत : अमेरिकेच्या थिंक टँकच्या अहवालात दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनने अक्साई चीनपर्यंत रस्ते, आउटपोस्ट, हेलिपोर्ट आणि कॅम्प तयार केल्याचा दावा अमेरिकन थिंक टँक चेटहेम हाउसने केला आहे. अक्साई चीनपर्यंत रसद पुरवठ्याचा नवा मार्ग निर्माण करण्याची चीनची योजना आहे. चेटहेम हाउसने मागील 6 महिन्यांमधील उपग्रहीय छायाचित्रांच्या विश्लेषणाच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. अक्साई चीन या भारतीय भूभागावर चीनने 1962 च्या युद्धापासून कब्जा केलेला आहे.
थिंकटँकने ऑक्टोबर 2022 पासूनच छायाचित्रांद्वारे चीनच्या हालचालींवर नजर ठेवली होती. अक्साई चीन लेकनजीक वादग्रस्त भागात ड्रॅगनने हेलिपोर्ट तयार केला आहे. चीन तेथे 18 हँगर्स आणि छोट्या धावपट्ट्यांची निर्मिती करत आहे, तेथे आपत्कालीन स्थितीत ड्रोन, हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने उ•ाण करू शकतात.
चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी येथे सातत्याने स्वत:चे बळ वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेली धावपट्टी अधिक रुंद केली आहे. याद्वारे भारताच्या मोहिमेला प्रत्युत्तर देण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. याचबरोबर आउटपोस्ट, मॉडर्न वेदरप्रूफ कॅम्प निर्माण केले असून तेथे सोलर पॅनेल बसविण्यात आल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येते. देपसांग भागात देखील चीन सक्रीय आहे, परंतु भारताने देखील या भागात स्वत:चे सैन्य तैनात केले आहे.
महामार्ग निर्मितीच्या तयारीत
चीन 2035 पर्यंत शिंजियांग आणि तिबेटला जोडणारा महामार्ग निर्माण करण्याच्या तयारीत आहे. हा मार्ग अक्साई चीनजवळून जाणार आहे. महामार्गामुळे चीनचा रसद पुरवठा सुलभ होणार आहे. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झटापट झाल्यापासून चीन तेथे मोठी मोहीम साकारण्याची तयारी करत आहे. सीमेवर हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. गलवान खोऱ्यात जून 2020 मध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे मानले जाते.









