पंच राखी प्रभुदेसाई नाईक यांच्यातर्फे आयोजन, माजी भारतीय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्या हस्ते बक्षिसवितरण
सांगे : ‘नेत्रावळी प्रीमियर लीग’ची यंदाच्या तिसऱया वर्षातील स्पर्धा नुकतीच होऊन बक्षिसवितरणाला 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेले कीर्ती आझाद यांनी लावलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली. ‘वुई फॉर सांगे’ या मंचाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. ब्लेझिंग गौर्स तुडव हा संघ या स्पर्धेचा विजेता ठरला. त्यांना रोख रु. 80,000 आणि चषक, तर उपविजेत्या सायलंट किलरला रु. 50,000 व चषक असे पारितोषिक प्राप्त झाले. तृणमूल काँग्रेस सरचिटणीस आणि नेत्रावळी पंचायत सदस्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भूतो वॉरियर्स, स्काय फोर्स, आरसीबी स्ट्रायकर्स वेर्ले, आरआरआर स्ट्रायकर्स, बूम बूम बॅशर्स, एबी शिसागर एसएन 2, सायलंट किलर आणि ब्लेझिंग गौर्स तुडव हे आठ संघ सहभागी झाले. या संघांनी नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातून लिलावाद्वारे क्रिकेट खेळाडूंची निवड केली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ब्लेझिंग गौर्स तुडवचा विराज गावकर, तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज ब्लेझिंग गौर्स तुडवचा प्रेमानंद गावकर ठरला. त्यांना चषकासह 26 इंचांचा संपूर्ण एचडी-एलईडी टीव्ही संच देण्यात आला. सायलंट किलरचा सुहास मोरजकर हा स्पर्धावीर ठरून त्याला चषकासह रेफ्रिजरेटर देण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन तृणमूल काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आणि नेत्रावळीच्या पंच राखी प्रभुदेसाई नाईक यांनी नेत्रावळीचे उपसरपंच फ्रान्सिस मास्कारेन्हस, कुष्ट गावकर, श्री बेताळ मंदिराचे पुजारी यांच्या उपस्थितीत केले. बक्षिसवितरण समारंभात गोवा तृणमूल काँग्रेसच्या सदस्या सलोनी मोरजकर यांनीही हजेरी लावली. या स्पर्धेने प्रचंड गर्दी खेचली. मुख्य आकर्षण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे प्रदेश प्रभारी कीर्ती आझाद यांची उपस्थिती हे राहिले. या स्पर्धेला नेत्रावळी आणि सांगेसारख्या अंतर्गत भागांतून जो प्रतिसाद लाभला तो पाहून कीर्ती आझाद आश्चर्यचकीत झाले. नेत्रावळी आणि सांगेतील युवा क्रिकेटपटूंच्या गुणांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी राखी प्रभुदेसाई नाईक यांची प्रशंसा केली. त्यांनी केवळ विजेत्या संघाचेच नव्हे, तर सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिकेटपटूचे अभिनंदन केले. आपण राष्ट्रीय संघातून खेळताना केवळ भारत देशासाठी खेळलो. संघाचे हितच सदैव डोळय़ांसमोर होते, असे आझाद यांनी सांगितले. या स्पर्धेत सीमारेषेबाहेर चेंडू पकडणाऱया प्रेक्षकांची दखल घेण्यात येऊन त्यांना साडीची भेट देण्यात आली. राखी प्रभुदेसाई नाईक यांनी नेत्रावळी प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याबद्दल अनेक क्रीडापटूंनी त्यांची प्रशंसा केली.









