सावरी, मैना..पी धबधबे शनिवार, रविवारी पर्यटकांनाही होतायत फुल्ल : वनखात्याच्या तिजोरीतील महसुलात वाढ
सांगे…. प्रसाद तिळवे : निसर्ग सौंदर्याचा सुंदर अविष्कार घडविणाऱ्या नेत्रावळीत सध्या वर्षा पर्यटनाला बहर आला आहे. नेत्रावळी अभयारण्यातील जगप्रसिद्ध ‘सावरी’ आणि ‘मैना… पी’ धबधबे धो..धो कोसळू लागले आहेत. त्यामुळे हे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी देशी पर्यटकांची पावले आत्ता धबधब्यांच्यास्थळी वळू लागली आहेत. वीकएन्ड अर्थात शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे धबधबे पाहण्यासाठी येत असतात. डोळ्याचे पारणे फेडणारे हे धबधबे सध्या आकर्षण बनले आहे. कोरोनामुळे हे धबधबे निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे वन खात्याचे प्रवेश तसेच वाहन, कॅमेरा फीपोटी मिळणारा महसूल बुडाला होता. उलट नेत्रावळी येथील लोकांचा व्यवसाय थंडावला होता. एकूणच कोरोना महामारीमुळे नेत्रावळीतील बंद असलेला ‘इको टुरिजम’ खऱ्या अर्थाने ऑगस्ट 2021 पासून खुला झालेला आहे. तऊणांईची क्रेज जणू निराळीच.
पदभ्रमण, साहसी पर्यटनासाठी उपयुक्त ठिकाणे
भर पावसात ओलांचिंब भिजून आनंद लुटणे, मौज -मजा करणे याला प्राध्यान असते. नेत्रावळीवर जणू निसर्गाने भरभरून प्रेम केले आहे. वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येथे प्रसिद्ध सावरी धबधब्यासह तुडवचा मैना… पी धबधबा, तुडव गावातील उदेंगी धबधबा, पालीचा धबधबा यासह वेर्ले ते साळजीणी रस्त्याच्या बाजूने डोंगर माथ्यावऊन पावसाळ्dयात कोसळणारे असंख्य लहान धबधबे पर्यटकांचे मन प्रसन्न करून सोडत असतात. सावरी धबधब्याकडे वेर्ले रस्त्याच्या बाजूने वाहने पार्क करून माट्टोनी येथून जो मातीचा रस्ता आला आहे, त्याद्वारे पुढे जाता येते. याठिकाणी आबाल-वृद्ध, महिला, लहान मुले सहज जाता येते. पावसाळा सुऊ झाला की मोठ्या प्रमाणावर निसर्ग प्रेमीची पावले सावरी धबधब्याकडे लागायची. उन्हाळ्dयात विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात सावरी, मैना..पीला भेट देतात.
पावसाचा जोर वाढला
सांगे भागात रविवारपर्यंत एकूण 1050.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असून रविवारी एकाच दिवशी 148.2 मि.मी. इतका पाऊस पडला. त्यामुळे साळावली धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन सध्या 31.62 मीटर इतके झाले आहे. गेल्यावर्षी 35.39 मीटर इतकी पाण्याची पातळी होती. अजून धरण भरून पाणी वाहण्यास 11 मीटर पाण्याचा साठा होणे गरजेचे आहे.
सावरी धबधबा..!
सावरी धबधबा आज खूप प्रसिद्ध आहे. सुमारे 60 फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा सध्या पाहण्यात खूप मजा येते. पांढरेशुब्र थंडगार कोसळणारे पाणी अंगावर शहारे आणतात. नेत्रावळी माट्टोनी वन खात्याचे प्रवेशद्वार ते सावरी धबधबा हे अंतर 3.5 किलोमीटर इतके आहे. नेत्रावली वन्यजीव विभागाने पर्यटकांना सोईचे व्हावे म्हणून 250 चिऱ्याच्या दगडी पायऱ्या सावरी धबधब्याठिकाणी बांधलेल्या आहेत. शिवाय जीवरक्षक तैनात केले आहेत. सावरी धबधब्याच्या वरच्या बाजूस श्री नासादेव मंदिर असून तो धबधब्यातून येणाऱ्या पाण्याचे रक्षण करतो, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. सावरीसह, मैना… पी आणि उदेंगी धबधबा बारमाही कोसळतो.
मैना….. पी धबधबा!
तुडव येथील हा धबधबा मैनापी धबधबा म्हणून ओळखला जातो. सुमारे 4.85 किलोमीटर जंगलातून सुमारे तास सव्वा तास चालत जावे लागते. भर पावसात चालत जाण्याचा आनंद वेगळाच असतो. येथे केवळ साहसी पर्यटकच जाऊ शकतात. मध्ये थकवा आल्यावर काही काळ विश्रांती घेण्यासाठी वन खात्याने वाटेच्या बाजूला लहान झोपड्या उभारलेल्या आहेत. पदभ्रमणसाठी ही जागा उत्तम असून नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रात मोडत आहे. आम्ही धबधब्याचे दर्शन घेतले आणि मनसोक्त आनंद लुटला असे धबधबा पाहण्यासाठी गेलेले गौरीश नाईक यांनी सांगितले. धबधब्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हा धबधबा तुडव जंगलात असून नेत्रावलीहून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे. ट्रेकिंग करीत करीत धबधब्याकडे पोचता येते. पावसाळ्dयात हे जिकिरीचे असून साहसी पर्यटक व तऊणांईचा कल जास्त असतो. सध्या नेत्रावळीतील सर्व धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. फेसाळणारे हे धबधबे जणू निसर्गप्रेमीना व पर्यटकांना साध घालीत आहे.
नेत्रावळीतील इतर पर्यटनस्थळे
तुडव येथील गावातच असलेला उदेंगी धबधबा वयोवृद्ध आणि बच्चे कंपनीसाठी योग्य आहे. पालीचा धबधबा व मैना… पी धबधबा पदभ्रमणसाठी उपयुक्त आहे. गोवाभरातील पर्यटक पावसाळ्dयात पाली, मैना… पीला अधिक पसंती देतात. धबधब्यासह नेत्रावळी येथील प्रसिद्ध ‘बुडबुड तळी’ व श्री गोपीनाथाचे देऊळ, पुरातन दत्तगुंफा व तेथील श्री दत्तमंदिर, हिल्स्टेशन म्हणून वेर्ले आणि साळजीनी गावं व पावसाळ्dयात डोंगर कपारितून कोसळणारे मनमोहक धबधबे, मसाल्याच्या बागा, पोफळीच्या बागायती वर्षा पर्यटनात भर घालीत आहे.
वनखात्याच्या तिजोरीत लाखोंचा महसूल
धबधबा पहायचा असेल तर शंबर ऊपये प्रवेश फी पोटी मोजावे लागतात. याशिवाय वाहन, कॅमेरा फी वेगळीच आहे. सध्या हे धबधबे वन खात्याच्या तिजोरीत लाखो ऊपयाचा महसूल गोळा करीत आहे. सावरी धबधब्यावर सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत प्रवेश दिला जातो. तसेच नेत्रावळी अभयारण्यात हे धबधबे येत असून येथे प्लास्टिक नेण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुऊंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
साधन, सुविधांचा वानवा
नेत्रावळीत ‘इको टुरिझम आणि साहसी पर्यटनाला’ खूप वाव आहे. मात्र वन खाते व नेत्रावळी अभयारण्य विभागाने त्यादृष्टीने विकास करण्याची गरज आहे. सावरी आणि मैना… पी धबधब्याकडे जाण्यासाठी वनखाते पर्यटकाकडून फी आकारते पण बऱ्याच सुविधांची वानवा आहे.









