टी-20 प्रकारात पहिल्यांदाच हा ऐतिहासिक विजय
वृत्तसंस्था / ग्लास्गो
क्रिकेटच्या टी-20 या अतिजलद प्रकारामध्ये नेदरलँड्स संघाकडून नवा इतिहास नोंदविला गेला. लिस्ट ए क्रिकेटमधील येथे झालेल्या चुरशीच्या टी-20 सामन्यात नेदरलँड्सने नेपाळचा तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पराभव करण्याचा पराक्रम केला.
सोमवारी झालेल्या या चुरशीच्या सामन्यात नेदरलँड्स संघातील मिचेल लेव्हीटने तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये षटकार ठोकून आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. या सामन्यात नेदरलँड्सने 20 षटकात 7 बाद 152 धावा करत नेपाळला विजयासाठी 153 धावांचे आव्हान दिले. नेपाळने 20 षटकात 8 बाद 152 धावा जमविल्याने सामना बरोबरीत राहिला. नेपाळ संघातील नंदन यादवने 2 चौकार ठोकले. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार नोंदविला. पंचांनी हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये कुशल भुर्तेलने 18 धावा फटकावल्याने नेपाळने या ओव्हरमध्ये 19 धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड्सच्या मॅक्स ओ दाऊदने सुपर ओव्हरमधील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे षटकार आणि चौकार नोंदविल्याने नेदरलँड्सने नेपाळशी बरोबरी साधली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना 17 धावा जमविल्या. पण नेपाळनेही 17 धावा जमवित कोंडी कायम ठेवली. पंचांनी तिसऱ्या सुपर ओव्हरचा निर्णय घेतला. या तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सचा फिरकी गोलंदाज कॅचेटने नेपाळचे दोन फलंदाज चार चेंडूत एकही धाव न देता बाद केले. त्यानंतर नेदरलँड्सने तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार नोंदवून विजय नोंदविला. नेदरलँड्सच्या लेव्हीटने हा निर्णायक षटकार खेचला. लिस्ट ए तिरंगी टी-20 स्पर्धेत यजमान स्कॉटलंड हा तिसरा संघ आहे.









