वृत्तसंस्था/ कोलकाता
2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथील इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात नेदरलँडस्ने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव करत आपला या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. 23 धावात 4 गडी बाद करणाऱ्या नेदरलँड्सच्या पॉल व्हॅन मिकेरीनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. सदर स्पर्धेतील हा 28 वा सामना आहे. बांगलादेशचा स्पर्धेतील हा पाचवा पराभव आहे.

या सामन्यामध्ये नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्सचा डाव 50 षटकात 229 धावात आटोपला. कर्णधार स्कॉट एडवर्डस्ने शानदार अर्धशतक (68 धावा) झळकवले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते. नेदरलँड्सच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले दोन फलंदाज केवळ 4 धावात तंबूत परतले. त्यानंतर बॅरेसी आणि अॅकरमन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर नेदरलँड्सने आणखी दोन फलंदाज लवकर गमवले. नेदलँड्सचा निम्मा संघ 27 षटकात 107 तंबूत परतला होता. बॅरेसी आणि कर्णधार एडवर्डस् यांनी सहाव्या गड्यासाठी 78 धावांची भागीदारी केल्याने नेदरलँड्सला 229 धावापर्यंत मजल मारता आली. एडवर्ड्सने 89 चेंडूत 6 चौकारासह 68, बॅरेसीने 41 चेंडूत 8 चौकारासह 41, इंग्लेब्रेटने 3 चौकारासह 35, लोगेन व्हॅन बेकने 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 23, डिलेडीने 2 चौकारासह 17 तर अॅकरमनने 1 चौकारासह 15 धावा जमवल्या. नेदरलँड्सच्या डावात 2 षटकार आणि 22 चौकार नोंदवले गेले. नेदरलँड्सने पहिल्या पॉवर प्ले दरम्यान 10 षटकात 47 धावा जमवताना 2 गडी गमवले. तर शेवटच्या 10 षटकामध्ये नेदरलँड्सने 74 धावा जमवताना 5 फलंदाज गमवले. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम, तस्कीन अहमद, मुस्ताफिजूर रेहमान आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 गडी तर शकीब अल हसनने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेदरलँड्सच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव कोलमडला. बांगलादेशच्या डावात मेहदी हसन मिराजने एकाकी लढत देत 40 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 35 धावा जमवल्या. बांगलादेशने पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 10 षटकात 39 धावा जमवताना दोन फलंदाज गमवले. दास आणि टी. हसन यांनी 19 धावांची भागीदारी केल्dयानंतर नेदरलँडस्च्या आर्यन दत्तने दासला 3 धावावर झेलबाद केले. व्हॅन बेकने टी हसनला 15 धावावर झेलबाद केले. यष्टीरक्षक आणि कर्णधार एडवर्डस्ने बांगलादेशच्या या फलंदाजांचे झेल टिपले. नजमुल हुसेन शांतो मिकेरीनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 9 धावा केल्या. मिकेरीनने बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला केवळ 5 धावावर एर्डवर्ड्करवी झेलबाद केले. मेहदी हसन मिराज पाचव्या गड्याच्या रुपात तंबूत परतला. बांगलादेशची यावेळी स्थिती 17 षटकात 5 बाद 69 अशी होती. मिकेरीनने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना मुशफिकर रहीमचा एका धावेवर त्रिफळा उडवला. 23 व्या षटकाअखेर बांगलादेशची स्थिती 6 बाद 81 अशी केविलवाणी होती. मेहमुदुल्ला आणि मुस्ताफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 20 धावांचे योगदान दिल्याने बांगलादेशचा डाव थोडा लांबला. पण नेदरलँड्सच्या मिकेरीनने बांगलादेशला 42.2 षटकात 142 धावात रोखले. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. मिकेरीनने 23 धावात 4, डिलेडीने 2 तर आर्यन दत्त, व्हॅन बेक व अॅकरमन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : नेदरलँड्स 50 षटकात सर्वबाद 229 (एर्डवर्डस् 68, बॅरेसी 41, अॅकरमन 15, डिलेडी 17, इंग्लेब्रेट 35, व्हॅन बेक नाबाद 23, एस. इस्लाम, तस्कीन अहमद, मुस्ताफिजूर रेहमान आणि मेहदी हसन मिराज प्रत्येकी दोन बळी, शकीब हसन 1-37).
बांगलादेश 42.2 षटकात सर्वबाद 142 (मेहदी हसन मिराज 35, मेहमुदुल्ला 20, मुस्ताफिजूर रेहमान 20, मेहदी हसन मिराज 17, टी. हसन 15, मिकेरीन 4-23, डिलेडी 2-25, दत्त, व्हॅन बेक, अॅकरमन प्रत्येकी 1 बळी).









