वृत्तसंस्था /राऊरकेला
विश्व हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या प्रो-लिग हॉकी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बलाढ्या नेदरलँड्सने भारताचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाचा खेळ निश्चितच दर्जेदार झाला पण त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही. महिलांच्या प्रो-लिग स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारत आणि नेदरलँड्स महिला हॉकी संघामध्ये 6 सामने झाले असून त्यापैकी 5 सामने नेदरलँड्सने जिंकले आहेत. नेदरलँड्स आणि भारत यांच्यातील झालेल्या सामन्यात नेदरलँड्सचा एकमेव आणि निर्णायक गोल 27 व्या मिनिटाला अल्बेर्स फेलिसीने केला. फेलिसीने चेंडूवर नियंत्रण मिळवित तिने भारताच्या बचाव फळीला तसेच गोलरक्षकाला हुलकावणी देत हा मैदानी गोल नोंदविला. फेलिसीचा सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली महिला हॉकी संघाचा हा दुसरा पराभव आहे. गेल्या आठवड्यात भुवनेश्वरमध्ये झालेल्या सामन्यात विद्यमान ऑलिम्पिक, विश्व तसेच प्रो-लिग चॅम्पियन नेदरलँड्सने भारताचा 3-1 असा फडशा पाडला होता.









