वृत्तसंस्था/ ऍडलेड
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्स संघाने आपला पहिला विजय नोंदविला. बुधवारी गट-2 मधील झालेल्या सामन्यात मॅक्स ओ दाऊदच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर नेदरलँड्सने झिम्बाब्वेचा 5 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. झिम्बाब्वेचा डाव 19.2 षटकात 117 धावात आटोपला. त्यानंतर नेदरलँड्सने 18 षटकात 5 बाद 120 धावा जमवित हा सामना दोन षटके बाकी ठेवून 5 गडय़ांनी जिंकला.

नेदरलँड्सच्या अचूक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. त्यांच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. अष्टपैलू सिकंदर रझाच्या 40 धावांच्या खेळीमुळे झिम्बाब्वेला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला. सिकंदर रझाने 24 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 40 तर सिन विलियम्सने 23 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा जमविल्या. विलियम्स आणि सिकंदर रझा यांनी चौथ्या गडय़ासाठी 48 धावांची भर घातली. झिम्बाब्वेचे पहिले 3 फलंदाज 6 षटकात 20 धावात तंबूत परतले होते. मध्वरेने 1, कर्णधार एर्विनने 3 तर चेकाबेव्हाने 5 धावा जमविल्या. शुंभाने 2, ब्युरेलने 2, जाँगवेने 6, निग्वेराने 1 षटकारासह 9 आणि छेत्राने नाबाद 6 धावा केल्या. नेदरलँड्सतर्फे मिकेरिनने 29 धावात 3, ग्लोव्हरने 29 धावात 2, व्हॅन बिकने 17 धावात 2, डिलेडीने 14 धावात 2 गडी बाद केले. क्लेसनने 17 धावात 1 बळी मिळविला. झिम्बाब्वेच्या डावात 4 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नेदरलँड्सच्या डावात सलामीचा मायबर्ग 8 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मॅक्स ओ दाऊद आणि कूपर यांनी दुसऱया गडय़ासाठी 73 धावांची महत्त्वापूर्ण भागीदारी केली. कूपरने 29 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 32 तर मॅक्स ओ दाऊदने 47 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 52 धावा झळकविल्या. ऍकरमन एका धावेवर बाद झाला. कर्णधार एडवर्ड्सने 1 चौकारासह 5 धावा केल्या. डिलेडीने 12 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 12 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. नेदरलँड्सच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे निग्वेरा आणि मुझारबनी यांनी प्रत्येकी 2 तसेच जाँगवेने 1 गडी बाद केला.
या स्पर्धेत नेदरलँड्स संघातर्फे हा पहिला विजय आहे. झिम्बाब्वे संघाचे या सामन्यातील पराभवामुळे उपांत्यफेरीसाठीचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. नेदरलँड्सचा आता या स्पर्धेतील शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर येत्या रविवारी होणार आहे. तर झिम्बाब्वेचा या स्पर्धेतील शेवटचा सामना भारताबरोबर येत्या रविवारी मेलबोर्नच्या मैदानावर खेळविला जाणार आहे. झिम्बाब्वेने या स्पर्धेत पाकिस्तानवर थरारक विजय मिळविला होता.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे 19.2 षटकात सर्वबाद 117 (सिकंदर रझा 40, सिन विलियम्स 28, निग्वेरा 9, मिकेरीन 3-29, ग्लोव्हर 2-29, व्हॅन बेक 2-17, डिलेडी 2-14, क्लेसन 1-17), नेदरलँड्स 18 षटकात 5 बाद 120 (मॅक्स ओ दाऊद 52, टॉम कूपर 32, डिलेडी नाबाद 12, निग्वेरा 2-18, मुझारबनी 2-23, जाँगवे 1-25).









